शिकवणीचालकांकडून फोन; मोबाइलच्या माहितीमुळे पालक त्रस्त

औरंगाबाद : ‘तुमचा मुलगा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालाय. आमचा अमुक ठिकाणी क्लास असून प्रत्यक्ष भेटण्यासाठी आलात तर शैक्षणिक शुल्कामध्ये आम्ही तुम्हाला सवलत देऊ. कारण आम्हाला हुशार विद्याथ्यार्ंना घडवायचे आहे,’ अशा भुलवणाऱ्या फोनची मालिकाच सुरू झाल्यामुळे पालकवर्ग त्रस्त झाला आहे. आपला मोबाइल क्रमांक कोणाकडून पुरवला गेला, असा प्रश्न सध्या पालकांना पडला आहे.

दहावीचा निकाल लागून आता महिना उलटला आहे. अकरावी, तंत्रनिकेतनसह विविध कोर्सेससाठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही खासगी शैक्षणिक संस्थाचालकांकडून प्रवेशाची प्रक्रिया मोफतपणे राबवण्यात आली. येथूनच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे फोन क्रमांक कोचिंग क्लासेसवाल्यांकडे गेल्याचा संशय असून सध्या दिवसभरात सहा ते सात किंवा त्यापेक्षा अधिक शिकवणीचालकांच्या संस्थांमधून पालकांना फोन सुरू झाले आहेत. सकाळी दहापासून सुरू झालेल्या फोनवर सायंकाळी सहापर्यंत उत्तर देता-देता पालकवर्ग त्रस्त झाला आहे. ‘तुम्ही अमूक-तमूकचे पालक बोलताय ना?.. तुमच्या मुलाला एवढे गुण मिळाले आहेत आणि राहताय त्या भागापासून जवळच आमचा क्लास आहे. ‘नीट’मध्ये आमच्या क्लासचे एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आम्ही गुणवंत विद्यार्थाच्याच पालकांशी संपर्क करतो. वाजवी शुल्क आकारतो. ८० टक्क्यांपुढच्या विद्यार्थ्यांना २५ टक्के, ९० टक्क्यांपुढच्या विद्यार्थ्यांना ४० टक्के शुल्क माफ करतो. प्रत्यक्ष येऊन भेटलात तर आणखी काही कमी-जास्त होऊ शकते,’ असे फोन सध्या सकाळपासूनच सुरू झाल्याचे अनुभव पालकांना येत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्य़ातून दीड लाखांवर विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यातील अर्ध्यापेक्षा अधिक पालकांना फोन सुरू झाले असून मागील आठवडाभरापासून फोनच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. यासंदर्भात अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली असून मोबाइल क्रमांक कोणाकडून पुरवले गेले आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या कंपनीचा मोबाइल क्रमांक आहे त्यांच्याकडून की जेथून प्रवेश प्रक्रिया ‘मोफत सेवा’ म्हणून राबवण्यात आली त्यांच्याकडून पुरवला गेला आहे, असा प्रश्न पालकवर्ग विचारत आहे.