संगणकीय कौशल्यावरून शंभर, पन्नास व वीस रुपयांच्या बनावट नोटा तयार करणारी टोळी औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणली. या टोळीकडून नाशिकमध्ये एक लाखाची तर याशिवाय मालेगाव व जालन्याजवळील बदनापूरमध्येही ही रक्कम चलनात आणण्यात आल्याचे उघडकीस आले असून टोळीशी संबंधित आणखी एका तरुणाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार बठकीत सांगितली.

सय्यद सफ सय्यद असद, सय्यद सलीम सय्यद मोहंमद व शेख समरान उर्फ लक्की रशीद शेख अशी प्रमुख आरोपींची नावे आहेत. यातील लक्की हा उच्चशिक्षित आहे. त्याचे बीएसस्सी कॉम्प्युटरचे शिक्षण झालेले आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.

सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ व रवींद्र साळोखे यांनी सांगितले की, कटकट गेट परिसरात बनावट नोटा तयार केल्या जायच्या. घनश्याम सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात ९५ शंभरच्या बनावट नोटा हाती लागल्या. त्यातील काही नोटा एका आरोपीकडे तर उर्वरित काही नोटा दुसऱ्या आरोपीकडे आढळून आल्या. सय्यद सफ आणि सय्यद सलीम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी बनावट नोटा या शेख समरान उर्फ लक्की कडून आणल्याचे सांगितले. लक्कीच्या नेहरूनगरातील घरात छापा मारला असता  तेथे बनावट नोटा तयार करण्याचे संगणकाशी जोडण्यात येणारे मुद्रण यंत्र, हिरव्या रंगाचे रेडियम टेप व अर्धवट तयार झालेल्या नोटा आदी साहित्य मिळून आले. तसेच संपर्कासाठी पाच किमती मोबाइल, असा ८६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी शेणपुंजी बाजारात बनावट नोटा चलनात आणल्याची कबुली दिली आहे. या आरोपींनी ५०० व २ हजार रुपयांच्या बनावट नोटाही चलनात आणल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळातही काही बनावट नोटा चलनात आणल्या का, याचीही माहिती आता त्यांच्याकडून घेतली जाईल. तयार केलेल्या बनावट नोटा या नाशिक, मालेगावातही पोहोचल्या असून यामध्ये एका तरुणाचा सहभाग आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. जालन्याजवळील बदनापुरातही काही नोटा पोहोचल्या असल्याची माहिती पुढे येत आहे, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सय्यद सफ व सय्यद सलीम हे दोघेही गुन्हेगारीवृत्तीचे असून त्यांच्याविरुद्ध वेदांतनगर, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहे. बनावट नोटा प्रकरणाचा गुन्हा पुंडलिकनगर ठाण्यात दाखल करण्यात आल्याचे सोनवणे यांनी सांगितले.