मराठवाडा मुक्तिदिनी मुख्यमंत्र्यांकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा

औरंगाबाद  औरंगाबाद ते अहमदनगर असा रेल्वेमार्ग नव्याने प्रस्तावित करण्याच्या हालचालींना वेग आला असून या नव्या मार्गामुळे मालवाहतुकीचे १५३ किलोमीटरचे अंतर वाचेल, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत या प्रस्तावाबरोबरच पैठण येथे सुरू करावयाचे संतपीठ आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मदतीची नवी योजना मराठवाडा मुक्तिदिनापासून हाती घेतली जाण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद शहरातील रेंगाळलेल्या विविध योजनांना काहीशी गती मिळाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शिवसेनेचे नेते सरकारकडून मोठा प्रकल्प औरंगाबादमध्ये येऊ शकेल असा दावा करत होते. तो प्रकल्प नव्या रेल्वेमार्गाचा असण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण गेल्या दोन महिन्यांपासून हा नवीन प्रस्तावित मार्ग कसा योग्य याची माहिती मिळवत असून या नव्या रेल्वेमार्गामुळे विविध क्षेत्रांतील विकासाची गती वाढेल, असा अभ्यासही करण्यात आला आहे.

औरंगाबाद विभागातून गेल्या पाच वर्षांत ३५ हजार कोटी रुपयांचा महसूल केंद्र आणि राज्याच्या तिजोरीत जमा झाला होता. येत्या पाच वर्षांत तो ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढेल. विशेषत: स्टील, कृषी उत्पादने, वाहन उद्योग, प्लास्टिक आणि पॅकेजिंग या क्षेत्रात ही वाढ असू शकेल. औरंगाबादमधील अस्तित्वात असणारे उद्योग, त्यांचा माल पुण्यापर्यंत पाठविण्यासाठी जो मार्ग वापरतात, तो २६५ किलोमीटरचा असून औरंगाबाद, मनमाड, अहमदनगर असा वळसा घालून मालवाहतूक होते. त्याऐवजी औरंगाबाद-अहमदनगर असा मार्ग करणे सोयीचे आहे. औरंगाबाद-पुणे या रेल्वेमार्गावरून प्रतिदिन सरासरी १९५१ प्रवासी ये-जा करतात. त्यात २०१९-२० मध्ये थोडीशी वाढ झाली असली तरी ती फार मोठी नाही. २०१९-२० मध्ये प्रतिदिन प्रवाशांची संख्या २१३४ एवढी वधारली. तुलनेने रस्त्याने जाणाऱ्या मोटारी, दुचाकी, बस, ट्रक, मोठ्या आकाराच्या मालमोटारी यांची संख्या प्रतिदिन ३८ हजार एवढी

आहे. यातील काही वाहतूक जरी रेल्वेकडे वळाली तर त्याचा लाभ होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नवीन रेल्वेमार्ग अधिक परवडणारा ठरू शकेल. सध्या १५ हजार २५० मेट्रिक टनाची मालवाहतूक होते. त्यातील दहा टक्के वाहतूक जरी रेल्वेमार्गाने झाली तर त्याचा फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तिदिनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणात या मार्गाचा घोषणेचा समावेश असू शकेल, असे सांगण्यात येत आहे.

मराठवाड्यातील शेतीची समस्या अधिक गंभीर असल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणही खूप अधिक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत व्हावी म्हणून विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी १७ कोटी चार लाख रुपयांचा विशेष निधी राज्य शासनाने मंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

घरकुल योजना, घरगुती वीजजोडणी, गॅसजोडणी, शौचालय, सामूहिक विवाहसोहळे यांसह उत्पन्न वाढीच्या योजनाही उभारी-२ या कार्यक्रमात प्रस्तावित करण्यात आले आहे. यापूर्वीही तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी ही योजना अमलात आणण्याचा प्रयत्ना केला होता. पण तो पूर्णत: यशस्वी झाला नाही. आता पुन्हा योजना प्रस्तावित करताना निधीची मागणीही करण्यात आली आहे.

त्याचबरोबर पैठण येथे संत एकनाथ महाराज संतपीठ उभारले जाणार असून त्याचा अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. संतसाहित्य विभाग, तत्त्वज्ञान विभाग आणि संगीत या तीन विभागांत हा अभ्यासक्रम विभागला असून त्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम ठरविण्यात आलेले आहेत. मराठवाडा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमात या संतपीठाच्या कार्यान्वयाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असेही सांगण्यात आले आहे.

मराठवाड्यातील शेतीची समस्या गंभीर असल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणही खूप अधिक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत व्हावी म्हणून विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी १७ कोटी चार लाख रुपयांचा विशेष निधी राज्य शासनाने मंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.