करमाडच्या सरपंचाला शिवीगाळ केल्याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना निलंबित करण्यात आले आहे.

सोमवारी पोलीस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना खबर्‍याने मटका सुरु असल्याची माहिती दिली. यानुसार रोडगे यांनी कारवाईसाठी घटनास्थळी  धाव घेतली असता त्या ठिकाणी काहीच आढळले नाही. यामुळे संतापलेल्या रोडगे यांनी खबर्‍याला बदडले. या प्रकरणात करमाडचे उपसरपंच दत्ता उकर्डे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता रोडगे यांनी उकर्डे यांना शिवीगाळ केली. उपसरपंच उकर्डे यांच्याकडे सध्या करमाडच्या सरपंचपदाचा पदभार आहे. उकर्डेंना पोलीस शिवीगाळ करतात हे पाहिल्यावर गावकरी संतापले. त्यांनी गावात बंदची हाक दिली.

संतप्त जमाव करमाड पोलीस ठाण्यासमोर पोलीस उपनिरीक्षक रोडगेंवर कारवाई करण्याची मागणी करत होता. हा प्रकार पोलीस अधीक्षक आरती सिंह यांना कळताच त्यांनी करमाड पोलीस ठाण्यात पोहोचून जमावाला शांत केले आणि रोडगे यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. बुधवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.