पुढील ४८ तासांत गारपिटीचीही शक्यता

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्य़ासह मराठवाडय़ातील अनेक भागात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून रविवारी सायंकाळी काही भागात हलका पाऊस झाला. पुढील ४८ तासही पावसाळी वातावरणाचे असून उत्तर महाराष्ट्रासह औरंगाबाद जिल्ह्य़ातही गारपिटीच्या शक्यतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसाळी वातावरणाचा रब्बी हंगामातील तूर, ज्वारी, गहू आदी पिकांवर परिणाम होणार असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

डिसेंबर महिना सुरू असून कडाक्याची पडणारी थंडी ही पिकांना पोषक असते. विशेषत गव्हाची वाढ आणि दाणे भरणे हे थंडीच्या कडाक्यावरच अवलंबून असते. मात्र, मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गव्हाची वाढ खुंटली आहे. दाणे भरणीवरही ढगाळ वातावरणाचा परिणाम होतो. ज्वारीवर चिकटा रोग तयार होतो. तूर अनेक ठिकाणी सोंगायला आलेली असून पाऊस झाला तर शेंगा फुगून जातात. परिणामी बाजारभावही गडगडतो. तूर शेतक ऱ्यांच्या कामी येत नाही, असे शेतकरी गणेश हाके यांनी सांगितले.

औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्य़ात ३ डिसेंबपर्यंतच्या अहवालानुसार रब्बीची ८१.५७ टक्क्य़ांवर पेरणी झालेली झालेली आहे. रब्बीची एकूण ६ लाख ६४ हजार ३६ एवढय़ा सरासरी हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख ४१ हजार ६८२ म्हणजे ८१.५७ टक्के  पेरणी झालेली आहे. विभागात गव्हाच्या ९४ हजार ३२४.२० हेक्टरपैकी ९० हजार ३११ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची ९५.७५ तर ज्वारीची ६५.४२ टक्के हेक्टरवर पेरणी झाली आहे. विभागात ज्वारीचे सरासरी ३ लाख ६५ हजार ९९७.८४ हेक्टरपैकी २ लाख ३९ हजार ४४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

औरंगाबादेत रविवारी कमाल २५.२ तर किमान १८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. हिवाळा असतानाही थंडी मागील काही दिवसांत गायब झालेली आहे.

दोन दिवस हलका पाऊस

बुरवी चक्रीवादळ अरबी समुद्रात सक्रिय असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या कमी-जास्तीच्या दाबामुळे ढगाळ व पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. त्याचा परिणाम म्हणून साधारण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडय़ातही ढगाळ व पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. पुढील ४८ तासांत हलका पाऊस अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिकसह औरंगाबाद जिल्ह्य़ातील काही तालुक्यांमध्ये गारपीटही होण्याची शक्यता आहे. त्यानंतर थंडीची लाट अपेक्षित आहे.

– श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएमचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम अंतराळ आणि संशोधन केंद्र