आकाशवाणीचे सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी व कार्यक्रमप्रमुख, तसेच साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले नीळकंठ वासुदेवराव कोठेकर (वय ६५) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. अंतिम इच्छेनुसार त्यांचे घाटी रुग्णालयात देहदान करण्यात आले. कोठेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या कोठेकर यांनी औरंगाबाद, पुणे, जळगाव, परभणी, उस्मानाबाद येथे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केले. निवृत्तीनंतर काही काळ ते इग्नूच्या ज्ञानवाणी रेडिओ केंद्राचे संचालक होते. दांडगा जनसंपर्क असलेले कोठेकर सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमात त्यांनी काही काळ व्यतीत केला होता. समाजसेवक बाबा आमटे यांच्या सहवासातही ते राहिले होते. कोठेकर यांचे प्राथमिक शिक्षण परभणी जिल्ह्यातील सेलू येथे झाले. पुढे मराठी विषयात पदव्युत्तर परीक्षेत ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. वृत्तपत्रविद्या पदवी परीक्षेतील ते पहिले सुवर्णपदक विजेते ठरले, तर पदव्युत्तर परीक्षेत सर्वप्रथम आले होते.