गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यत  १७३ एकर भूसंपादन झाले असले तरी या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. तसेच महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या रेल्वे प्रवासी डब्बे बनविण्याच्या कारखान्याच्या तरतुदीबाबतही सांशकता असल्याने विदर्भाला भरभरून आणि मराठवाडय़ातील दोन्ही प्रकल्पांना ठेंगा असेच चित्र दिसून आले.

गुरुत्वीय लहरीसाठी ‘लिगो इंडिया’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू होत्या. अर्थमंत्रालयाकडून या प्रकल्पास लागणारी तरतुदीची छाननी झाली नसल्याने या अर्थसंकल्पातून या प्रकल्पाचे नक्की काय होणार हे स्पष्ट झालेले नाही.  एकूण तरतुदीमध्ये बोगी बनविण्याच्या कारखान्यास तरतूद आहे की नाही हे लातूर लोकप्रतिनिधींसमोरही कोडेच होते. संशोधन विकासासाठी मोठी तरतूद असली तरी त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यतील प्रकल्पासाठी तरतूद अद्यापि झाले नसल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

लिगो प्रकल्प उभारणीच्या निमित्ताने मौजे सिद्धेश्वर व दुधाळा येथील ४५.४८ हेक्टर खरेदी करण्यात आली आहे. ५.९४ हेक्टर जमीन लिगो इंडिया प्रकल्पाच्या अधिकारी यांना ताब्यात देण्यात आली आहे. तसेच वनक्षेत्रातील १२१.८३ हेक्टर क्षेत्रासाठी ३१.३६ कोटी निधी प्राप्त झाला आहे. ती जमीन मिळविण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पापर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यासाठी दोन कोटी ४४ तसेच अन्य किरकोळ स्वरुपासाठी अंदाजपत्रके सादर आहेत.

मात्र, मूळ प्रकल्पासाठी लागणारी कोटय़वधीची गंतवणूक होणार कधी हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तसेच लातूर येथील रेल्वे बोगी बनविण्याचे काम प्रगतिपथावर असून एक बोगी तयार केल्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागल्याचा दावा भाजप नेते करीत होते. त्यासाठी तरतूद आहे की नाही, हे कोडे लातूरच्या लोकप्रतिनिधींना होते. बोगी तयार करण्याचे काम रेल्वे कडून होणार की विकासकांना दिले जाणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही पण हे काम पूर्ण क्षमतेने मार्गी लागेल असा दावा आमदार अभिमन्यू पवार यांनी केला. केंद्रीय अर्थ संकल्पानंतर रेल्वे बोगीच्या कारखान्याच्या तरतुदीचे कोडेच असल्याचे दिसून आले आहे.

मराठवाडय़ाची घोर निराशा

केंद्र सरकारने प्रतिष्ठेचा म्हणून रेल्वे बोगी निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. त्याचे ७५ टक्के काम पूर्ण होत आलेले असताना त्याला पुरेसा निधी दिला नाही. ही मराठवाडय़ाच्या पदरी पडलेली घोर निराशा आहे.

अमित देशमुख, पालकमंत्री लातूर