20 October 2020

News Flash

औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूरमध्ये पाऊस

उर्वरित मराठवाडय़ावर आभाळमाया

(संग्रहित छायाचित्र)

मराठवाडय़ात दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाचा जोर आहे. रविवारी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये जोरदार पाऊस झाला. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व बीड जिल्ह्य़ात केवळ पावसाळी वातावरण होते. या जिल्ह्य़ांमध्ये दोन दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला.

औरंगाबाद शहरामध्ये सायंकाळी वादळवाऱ्यासह पाऊस झाला. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या व्यापारी संकुलावरील काही पत्रे उडाले, तर संकुलासमोरील पत्र्याचा भाग पडला. शहरात काही ठिकाणचे मोठे फलकही वादळामुळे कोसळले. इतर ठिकाणी काही झाडे उन्मळून पडली. तासभराच्या वादळ-वाऱ्यासह झालेल्या पावसाने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.

उस्मानाबाद शहर व परिसरात पहाटे जोरदार सरी बरसल्या. पहाटे ५ च्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसास सुरूवात झाली. वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले आहे.

अनेक वर्षांनंतर मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यची पावसाची सरासरी ७५५ मिलिमीटर एवढी आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. रविवारी सकाळी पावसाच्या सरींनी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यतील तुळजापूर, उस्मानाबाद आणि उमरगा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहाटे ४.३० च्या सुमारास सुरू झालेल्या पावसाच्या सरी सकाळी ७ वाजेपर्यंत कोसळत होत्या. सुमारे अडीच तासाहून अधिक काळ उस्मानाबाद शहर व परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली. शहरात पर्जन्यमापकावर केलेल्या नोंदणीनुसार रविवारी सकाळी झालेल्या पावसाची नोंद १६ मिलिमीटर एवढी नोंदली गेली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली, रूईभर, महाळंगी, बेंबळी, ढोकी, तेर या शिवारात पाणी साचले होते. लातूर शहर आणि जिल्ह्य़ातही सर्वदूर मध्यम स्वरुपाचा सुमारे तासभर पाऊस झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 2:03 am

Web Title: rain in aurangabad osmanabad latur
Next Stories
1 दहावी परीक्षेत मराठवाडय़ाचा टक्का घसरला
2 मराठवाडय़ातील ११ धरणे जलवाहिन्यांनी जोडणार
3 राज्यातील कला महाविद्यालयांचा अभ्यासक्रम जुनाट
Just Now!
X