20 October 2019

News Flash

हस्ताच्या दमदार पावसाने रब्बीसाठी अनुकूल स्थिती

औसा, निलंगा, चाकूरसह जिल्हय़ातील आठ तालुक्यांत गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला.

औसा, निलंगा, चाकूरसह जिल्हय़ातील आठ तालुक्यांत गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात सरासरी ९.४४ मिमी पाऊस झाला. या पावसाने जिल्हय़ाची सरासरी ३८४.३६ मिमीवर पोहोचली. निलंगा व औसा तालुक्यांत बऱ्याच ठिकाणी रब्बी पेरणी करता येण्याजोगा पाऊस पडल्यामुळे सकाळपासूनच बी-बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली होती. निलंगा, औराद शहाजनी, किल्लारी, औसा या ठिकाणी बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होती.
चाकूर तालुक्यातील नळेगाव, लातूर तालुक्यातील चांडेश्वर तर औसा तालुक्यातील तळणी येथे वीज पडून तिघे ठार झाले. नळेगाव येथील घटनेत जयजवान जयकिसान साखर कारखान्याजवळ किरण शंकर शिरुरे (वय ३०) हे शेतात झाडाखाली थांबले असता वीज पडून मरण पावले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. लातूर तालुक्यातील चांडेश्वर शिवारात नामदेव विठ्ठलराव नलवाडे (वय २८) हे रब्बीची पेरणी करून घराकडे येत असताना वीज पडून मरण पावले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. औसा तालुक्यातील तळणी येथील घटनेत राजेंद्र गंगाराम कांबळे (वय ५०) हे गुरे चारत होते. वीज कोसळून ते जागीच मरण पावले. त्यांच्या पश्चात अंध पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
निलंगा व औसा तालुक्यांत पावसाने चांगली हजेरी लावली. मातोळा मंडळात ५७, किल्लारी ४८, लामजना २२, भादा १५, निलंगा ५२, आंबुलगा २५, मदनसुरी २६, औराद शहाजनी २५, पानचिंचोली २६, कासार बालकुंदा १५, निटूर १५, मुरूड २५, नळेगाव १५, शेळगाव ३२, उजेड ३०, देवर्जन १२, उदगीर १२, बाभळगाव १२ व चाकूर १० मिमी पाऊस झाला. निलंगा तालुक्यात सर्वाधिक सरासरी २३.५०, तर औसा २१.४३, चाकूर १४.८० तर शिरूर अनंतपाळ तालुक्यात १५.३३ मिमी पाऊस झाला. अहमदपूर व देवणीत पावसाचा मागमूस नव्हता.

First Published on October 3, 2015 1:20 am

Web Title: rain in latur 4
टॅग Died,Farmer,Rain