२९ मंडलात अतिवृष्टी

जिल्हय़ात मंगळवारी सायंकाळपासून सर्वदूर परतीचा मान्सून बरसला. खरीप हंगामातील तूर व काही अंशी सोयाबीन पिकाला याचा लाभ होणार असून रब्बीसाठी हा पाऊस लाभदायक राहणार आहे.

अहमदपूर, चाकूर, निलंगा व शिरूर अनंतपाळ या चार तालुक्यांत २४ तासात अतिवृष्टी झाली, तर २९ मंडलात ६५ मि. मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसाने तेरणा नदीचे पात्र भरल्याने मदनसुरी, िलबाळा, तगरखेडा या उच्चपातळी बंधाऱ्याचे प्रत्येकी तीन दरवाजे उघडावे लागले. जिल्हय़ातील अनेक मंडळात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. पीक जोमात असले तरी ऐन दाणे भरण्याच्या कालावधीत पावसाने ओढ दिली, तर काही ठिकाणी सोयाबीन फुलोऱ्यात असताना ताण पडल्यामुळे त्याचा उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. मंगळवारच्या पावसामुळे काहीअंशी सोयाबीनला याचा लाभ होणार आहे. तुरीचे जिल्हय़ात सुमारे १ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. पावसाने दिलेल्या ताणामुळे तुरीच्या वाढीवर परिणाम होत होता. आता पावसामुळे तुरीच्या वाढीला चांगला लाभ होणार आहे.

निलंगा, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर व चाकूर या तालुक्यातील पाण्याची पातळी वाढण्यास या पावसाचा चांगला लाभ झाला आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी मंडळात ११५, मदनसुरी १०५, निलंगा १०२, निटूर १०७, आंबुलगा ९०, कासार बालकुंदा ८१, पानचिंचोली ७०. चाकूर तालुक्यातील चाकूर मंडळात ७१, वडवळ ९८, नळेगाव ११८, झरी ७५, शेळगाव ८८, उदगीर तालुक्यातील उदगीर मंडळात ६४, नागलगाव ७५, मोघा ६६, वाढवणा ७८, वलांडी ७५, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर अनंतपाळ ९०, उजेड ८०, साकोळ १०५, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर मंडळात ८२, अंधोरी ७६, खंडाळी ९०, शिरूर ताजबंद ८८, औसा तालुक्यातील औसा मंडळात ७९, किल्लारी ८५, लामजना ६५ तर रेणापूर तालुक्यातील कारेपूर मंडळात ६८ मि. मी. पाऊस झाला आहे.

१४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे- कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. लातूर ३८.६३ (५२९.७२), औसा ५७.४३ (५१२.०७), रेणापूर ४८.५० (६५७.९०), उदगीर ५९.८६ (६५७.४४), अहमदपूर ७७.३३ (७४९.९०), चाकूर ९० (६१९.८४), जळकोट ५५.५० (६०९.५०), निलंगा ९६.३८ (७०६.८७), देवणी ५२.६७ (५७७.६४), शिरूर अनंतपाळ ९१.६७ (६९९.७०), सरासरी ६६.८० (६६२.५५).

चाकूर मंडलात सर्वाधिक ८६६ मि. मी. आतापर्यंत पाऊस झाला असून सर्वात कमी पाऊस औसा तालुक्यातील भादा मंडळात ३२३ व उदगीर तालुक्यातील नळगीर मंडळात ३३१ मि. मी. इतका झाला आहे. या पावसाच्या असमानतेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

धणेगाव धरण अद्यापही कोरडेच

परतीच्या मान्सूनचा पाऊस सुरू झाला असला तरी गतवर्षी उन्हाळय़ात कोरडेठाक पडलेले धनेगाव धरणाचे पात्र अद्यापही तसेच आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस कळंब, केज परिसरात झाल्यामुळे लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणातील पाणीसाठय़ात अद्याप अजिबात वाढ झाली नाही. या धरणाची एकूण क्षमता २२४ दलघमी इतकी असून या पात्रात ०.३८५ दलघमी इतका अत्यल्प पाणीसाठा आहे. घागर घेऊन धरणाच्या पात्रात गेल्यानंतर ती भरायची कुठे, असा प्रश्न भर पावसाळय़ात पडला आहे.