गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी मराठवाडय़ात बहुतेक ठिकाणी पावसाने अवकाळी बरसात केली. दिवसा ऊन व ढगाळ हवामानाचा खेळ आणि रात्री थंडी अशा विचित्र वातावरणाचा प्रतिकूल परिणाम उभ्या पिकांवर होऊ लागला आहे. ज्वारी, हरभरा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला असून अवकाळी पाऊसामुळे दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे पिकांचीही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूरसह अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. यातील काही तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याचे वृत्त आहे. पैठण परिसरात सोमवारी संध्याकाळी तुरळक स्वरूपात पाऊस पडला. सध्या जायकवाडीच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे.
बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे मोठा पाऊस पडेल, अशी शक्यता होती. त्यातच हवामान विभागाने गारपिटीचा अंदाज वर्तविला होता. बीडसह सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांवर ढगाळ वातावरणामुळे किडींचा फैलाव वेगाने होत आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसांत मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने शेतकरी मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.