पाच जिल्ह्य़ांमध्ये पाऊस

औरंगाबाद : जालना, परभणी, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या पाच जिल्ह्य़ांमध्ये रविवारी रात्री व सोमवारी दिवसभरात पावसाने पुन्हा हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४८ महसूल मंडळांपैकी केवळ ११ मंडळांमध्ये पावसाने रविवारी दमदार हजेरी लावली. वाशी मंडळात सर्वाधिक ९८.३ मिलिमीटर पाऊस झाला. मात्र उर्वरित ३७ महसूल मंडळातील शेकडो गावांना आजही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसामुळे सीनेच्या उपनदीला एक ते दीड मीटपर्यंत नदी पात्रातून पाणी वाहिले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यासह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

परभणी- जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊस झाला. शहरावर पर्जन्यवृष्टी होत असताना आसपासच्या खेडय़ांमध्ये मात्र पाऊस बरसलाच नसल्याची माहिती आहे. मानवत, सेलू, पाथरी, गंगाखेड या तालुक्यांमध्ये काही  प्रमाणात पाऊस झालेला आहे.

लातूर- गेल्या दोन दिवसांपासून पावसाची दररोज हजेरी आहे. रविवारी रात्री व सोमवारी सकाळी जिल्हय़ात पावसाने चांगलीच हजेरी लावली. उदगीर मंडळात तब्बल ८० मि. मी. तर हेर मंडळात ८१ मि. मी. पाऊस झाला.

नांदेड- शहरासह जिल्ह्य़ात रविवारी रात्री सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत १८६.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून नांदेड तालुक्यात सर्वाधिक ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

नांदेड तालुक्यात ३८ मि.मी. पाऊस झाला असून त्यापाठोपाठ भोकर तालुक्यात ३६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धर्माबादला पाऊस झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात दिवसभरात १८६.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जालना- जिल्ह्य़ातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात अनेक भागांत चांगला पाऊस झाला. सोमवारी सकाळपर्यंत ६४ मिमी पावसाची नोंद झाली होती. परतूर तालुक्यात आतापर्यंत ५० मिमी तर घनसावंगी तालुक्यात ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

धूळपेरणी केलेल्या भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा या पावसाने पल्लवीत झाल्या आहेत.