जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून निसर्ग कोपला आहे. सलग तीन दिवस विजांचा कहर सुरू असून तीन दिवसांत आठजणांचा बळी विजांनी घेतला. शनिवारी तीन तालुक्यात विजा कोसळून चार महिलांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन मुलींचा समावेश आहे. एक गायही दगावली. पाथरी तालुक्यातील देवेगाव, मानवत तालुक्यातील रामपुरी आणि पूर्णा तालुक्यातील खरबडा येथे या घटना घडल्या.
दरम्यान, पाथरी तालुक्यातील वरखेड शिवारात शनिवारी दुपारी तीन वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा अर्धा तास पाऊस झाला. सर्वत्र गारांचा खच पडला होता. गारांच्या माऱ्यामुळे हाती आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले.
सध्या हस्त नक्षत्र सुरू असले, तरी अपेक्षित पाऊस पडत नाही. उलट दररोज उकाडा जाणवतो. दुपारी दोननंतर जिल्ह्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतात. मात्र, पावसासोबत वारा आणि विजांचा कडकडाट होत आहे. सध्या कापूस वेचणीस आला असून सोयाबीनचीही काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी महिला, पुरुष शेतावर दिसत आहेत. शनिवारी पावसाचे कोणतेही वातावरण नव्हते. मात्र, अचानक दुपारी तीननंतर विजांचा कडकडाट सुरू झाला. सोबत पावसाच्या सरीही कोसळल्या. पाथरी तालुक्यातील देवेगाव शिवारात रंजना भगवान साबळे (वय १८) व उज्ज्वला प्रभाकर साबळे (वय १६) या दोघी गावातील इतर महिलांसोबत कापूस वेचणीसाठी शेतात गेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजता पाऊस सुरू झाल्याने या दोघी आखाडय़ाकडे जात असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यातच दोघी जागीच ठार झाल्या. रंजना ही बारावीच्या वर्गात, तर उज्ज्वला दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दुसरी घटना मानवत तालुक्यातील रामपुरी येथे घडली. येथील सरस्वती दिगंबर राऊत (वय ३५) आणि सारिका बालासाहेब राऊत (वय ३०) या दोघी शेतात कापूस वेचत असताना साडेतीनच्या सुमारास या दोघींच्या अंगावर वीज पडली. यामध्ये सारिका राऊत यांचा मृत्यू झाला, तर सरस्वती राऊत या गंभीर जखमी झाल्या. त्यांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पूर्णा तालुक्यातही विजेचा कहर होता. खरबडा येथील हिरणाबाई अंबादास फुगणे (वय ५०) शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्या जागीच मरण पावल्या. उक्कलगाव येथील केशव गणपत उक्कलकर यांच्या गायीचाही वीज पडून मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारीही विजा कोसळून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला. पालम तालुक्यातील शिरपूर येथे दोघांचा, तर पूर्णा तालुक्यातील िपपळगाव लिखा येथील एकाचा या घटनेत मृत्यू झाला. यापूर्वी पाथरी तालुक्यातील विटा येथील शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. तीन दिवसांत आठजणांचा बळी विजांनी घेतला.