औरंगाबाद : पूर्व विदर्भ, मुंबई, कोकणात दमदार पाऊस झाला, तरी मराठवाडा तसा अजूनही कोरडाच आहे. मात्र सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. दोन्ही दिवसांत ढगाळ वातावरण असून हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊसही झालेला आहे. पूर्वा नक्षत्र दोन दिवसांनी संपणार असून त्याच्या अखेरीस पावसाच्या आगमनाने आशा पल्लवित झाल्या आहेत. अजूनही मराठवाडय़ातील अनेक धरणे कोरडीठाक आहेत.

औरंगाबाद शहर व परिसरात सोमवारी झालेल्या पावसाची नोंद ९.६ मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे. चिकलठाणा वेधशाळेकडून ही माहिती मिळाली. दोन दिवसांत झालेल्या पावसाने खरिपाची पिकांना संजीवनी मिळाली असून, यापुढे पावसाने ओढ दिल्यास मात्र पिकांना धोका संभवण्याची शक्यता कृषीतील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागल्याने पावसाचा जोर ओसरण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. औरंगाबाद शहरात मंगळवारीही काही ठिकाणी जोरदार तर उर्वरित ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दिवसभर पावसाळी वातावरण राहिले.

१२ सप्टेंबर रोजी श्रींच्या विसर्जनाच्या दिवशी पूर्वा नक्षत्रही संपत आहे. १३ सप्टेंबरपासून उत्तरा नक्षत्राचे आगमन होत आहे. या नक्षत्रात दमदार, जोरदार पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.