वातावरण ढगाळ, सूर्यनारायण मवाळ
एप्रिलच्या मध्यापासून मे अखेपर्यंत आग ओकणारा सूर्यनारायण आता पुरता मवाळ झाला असून जूनच्या सुरुवातीपासून बरसलेल्या रोहिण्यांमुळे वातावरणात निर्माण झालेला प्रचंड उकाडाही बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या भीजपावसाने गायब झाला आहे. सर्वदूर झालेल्या या भीजपावसाने वातावरण आल्हाददायक झाले आहे.
सलग दोन वर्षे सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाल्याने यंदाचा उन्हाळा अतिशय खडतर गेला. ‘न भूतो..’ पाणीटंचाई निर्माण झाली. एप्रिलच्या मध्यापासून उन्हाचा पाराही प्रचंड वाढला. भूपृष्ठावरील जलसाठे आटले, भूगर्भातील पातळीही खोल गेली. निरंकुश वृक्षतोडीने वाळवंटासारखे चित्र निर्माण झाले. त्यामुळे उन्हाळा अधिकच दाहक बनला. त्यात प्रशासकीय अनास्थेची भर पडली. रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारीपदाची भूमिका प्राधान्याने वठवू लागल्याने मग्रारोहयो अंमलबजावणीवर परिणाम झाला. प्यायला पाणी नाही आणि हाताला रोजगार नाही, या स्थितीत स्थलांतराला वेग आला.
मात्र, हे सगळे चित्र आता भूतकाळात जमा झाले आहे. दोन जूनपासूनच जिल्हाभर कमी-अधिक पाऊस झाला; परंतु मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मंगळवारी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला असला, तरी पहिलाच दिवस कोरडा गेला. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळपासूनच भीजपावसाला सुरुवात झाली. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर होता. बहुतांश शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदी झाली असून मोजक्या शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवातही केली आहे. मागील दोन वर्षांच्या अत्यंत वाईट आणि दिवाळे काढणाऱ्या अनुभवामुळे बहुतांश शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २ जूनपासून ते ६ जूनपर्यंत पावसाने किरकोळ स्वरुपात सर्वत्र हजेरी लावली. मंगळवार वगळता बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र हलका पाऊस झाला. नांदेड तालुक्यात सकाळच्या दोन तासांत हलका तुषार स्वरूपात पाऊस झाला. नायगाव, देगलूर, मुखेड, बिलोली, माहूर, किनवट, हदगाव तालुक्यांतही हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.
दुष्काळ निधीचे वेळेत वितरण
गतवर्षी खरीप हंगामाच्या नुकसानीपोटी अगोदर ३१४ कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. तो मेअखेर वितरीतही झाला. त्यानंतर जूनच्या सुरुवातीला आणखी २९ कोटी ८८ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधीही युद्ध पातळीवर वितरीत करण्यासाठी यंत्रणा राबते आहे. बी-बियाणे व खतांसाठी बळीराजा अजूनही बाजारात गर्दी करीत असून बियाणे, खतांची टंचाई निर्माण होऊ नये, या बाबत प्रशासनही दक्ष आहे. तूरडाळीचे क्षेत्र वाढावे, या साठी कृषी विभागामार्फत जनजागरणही करण्यात येत आहे. दरम्यान, पीककर्ज व पुनर्गठन या बाबत सरकारने सक्त सूचना दिल्या असल्या तरी बँका योग्य प्रतिसाद देत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत.