पावसाळय़ातील ६४ दिवस कोरडे गेल्याने मध्यंतरी मराठवाडा पुन्हा दुष्काळात जाण्याची शक्यता गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने पूर्णत: संपली आहे. मराठवाडा चिंब झाल्याने दऱ्या-डोंगर हिरवाईने नटले आहेत. मराठवाडय़ात अपेक्षित सरासरीच्या  ७१.६३ टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. या वर्षी पावसाळय़ात तब्बल ४५ जणांचा वाहून जाऊन तसेच भिंत पडून मृत्यू झाले. पावासाने चांगलेच मनावर घेतले असल्याने जायकवाडी जलाशयामध्ये या वर्षी सर्वाधिक ८८.१० टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी १९ सप्टेंबपर्यंत ८१.३३ टक्के पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत तसा कमी पाऊस दिसत असला तरी दुष्काळ सावट पूर्णत: संपले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून दररोज एकदा तरी पावसाची सर येतेच. मंगळवारी दुपारी औरंगाबाद शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा वेग एवढा होता की, शहरातील जनता बँक, संजयनगर, जयभवानीनगर भागात मोठय़ा प्रमाणामध्ये पाणी साचले. शहरातील काही सखल भागात घरातही पाणी घुसण्याच्या घटना घडल्या. मराठवाडय़ात सर्वदूर पाऊस पडल्याने पिकांची स्थितीही चांगली असल्याचे सांगण्यात येते.

धरणांमध्येही पुरेसा पाणीसाठा होऊ लागला आहे. विभागातील ११ मोठय़ा धरणांमध्ये ५७ टक्के पाणी आहे. येलदरी धरणातील पाणीसाठय़ात मात्र फारशी वाढ झालेली नाही. अन्य सर्व धरणांमध्ये पाणीसाठा वाढतो आहे. सिना कोळेगाव हे धरण १०० टक्के भरले आहे.