वाढदिवसानिमित्ताने औरंगाबाद शहरात फलकबाजी

विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले माजी उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरभर शुभेच्छांचे फलक लागले आहेत. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा त्यांचे पाय राजकारणाकडे वळू लागले असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘काही जुन्या कार्यकर्त्यांचा स्नेह असल्यामुळे त्यांनी शुभेच्छांचे फलक लावले आहेत. अजून कोणताही निर्णय घेतला नाही. पुढचे निर्णय पुढे घेऊ’. गेल्या चार वर्षांपासून राजकीय विजनवासात असणारे राजेंद्र दर्डा गेल्या आठवडय़ात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमवेतही एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची मरगळ झटकून टाकता यावी म्हणून आयोजित एका मेळाव्यात राजेंद्र दर्डा यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी वृत्तपत्राचा संपादक म्हणून काँग्रेसच्या व्यासपीठावरून बोलत असल्याचे स्पष्ट केले होते. एरवी काँग्रेसच्या कार्यक्रमांना गैरहजर राहणारे राजेंद्र दर्डा अचानक व्यासपीठावर दिसल्यानंतर ते पुन्हा राजकीय वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पुन्हा ते काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. गेल्या आठवडय़ात एका सार्वजनिक कार्यक्रमात अशोक चव्हाण यांच्यासमवेत ते दिसले खरे. मात्र, त्याचा राजकीय अर्थ काढता येऊ शकत नाही, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांचे मत आहे. ते म्हणाले, सध्यातरी ते राजकारणात परत येतील, असे संकेत मिळालेले नाहीत. दुसरीकडे दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद शहरात त्यांच्या समर्थकांनी शुभेच्छांचे भरमसाठ फलक लावले आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण, याचे उत्तर अद्यापही जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या मंडळींना देता येत नाही. या मतदारसंघात भाजपचे अतुल सावे विजयी झाले होते, तर एमआयएमचे गफार कादरी यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. राजेंद्र दर्डा यांना तिसऱ्या क्रमांकाची २१ हजार २०३ मते मिळाली होती. दर्डा यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याच्या प्रश्नावर आढेवेढे घेत पुढचे निर्णय पुढे घेऊ, असे म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण असल्यास दर्डा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जाते. सध्या तरी ते चाचपणी करीत आहेत. एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्याने मुस्लीम व दलित मतांचे ध्रुवीकरण झाल्यास काँग्रेससाठी मोठे आव्हान असेल. या साऱ्या शक्यता लक्षात घेऊनच दर्डा निर्णय घेतील, असे सांगण्यात येते.