News Flash

भाजपला दूर ठेवत शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ उपमहापौरपदी

महापालिका निवडणुकीसाठी केवळ तीन महिने असताना घडलेले हे राजकीय बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.

भाजपाला दूर ठेवत उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी महापौर नंदकुमार घोडेले व विकास जैन यांच्यासह शिवसेनेच्या विजयाप्रीत्यर्थ हात उंचावत आनंद साजरा केला.

औरंगाबाद : पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचे कारण  पुढे करत भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाला दूर ठेवत शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी ५१ मते घेत विजय मिळविला. काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे सहकार्य घेत शिवसेनेला या निवडणुकीमध्ये एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी मतदान केल्याचेही स्पष्ट झाले. भाजपने अपक्ष उमेदवार गोकुळ मलके यांना पुरस्कृत केले होते. त्यांना ३४ मते मिळाली. उपस्थित १०० सदस्यांपैकी दोन नगरसेवक तटस्थ राहिले तर १५ सदस्य गैरहजर होते.

ज्या योजनांना कार्यारंभ आदेश दिलेले नाहीत, अशा सर्व योजनांना स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यात औरंगाबाद शहराच्या अलीकडेच मंजूर करण्यात आलेल्या १६८० कोटी रुपयांच्या पाणी योजनेला मिळालेली मंजुरी अडकली. यावरून भाजपने शिवसेनेला पेचात पकडण्यासाठी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सेना-भाजपातील महापालिकेतील युती तुटल्याचे जाहीर करण्यात आले. या राजीनाम्यामुळे उपमहापौरपदाची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली. पीठासीन अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये भाजपने अपक्ष उमेदवार गोकुळ मलके यांना पुरस्कृत केले होते.

एमआयएमचे शेख जफर अख्तर यांनीही निवडणूक लढविली. औरंगाबाद महापालिकेमध्ये शिवसेना व अपक्षांचा ४० जणांचा गट आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची भर पडेल असे मानले जात होते. मात्र, काँग्रेसचे अफसरखान, आयुब खान हे सदस्य तटस्थ राहिले. पक्षाकडून उपमहापौरपदाची संधी मिळावी अशी अपेक्षा होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे अफसर खान यांनी मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाऊसाहेब जगताप, साहेल शेख, सायली जमादार, शबाना कलीम कुरेशी, अनिता साळवे यांनी शिवसेनेला मतदान केले. तर वैशाली जाधव यांनी भाजपचे गोकुळ मलके यांना मतदान केल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता विधाते, मोरे यांची मते मिळाली. चार सदस्यांपैकी दोन सदस्यांची मते शिवसेनेच्या पारडय़ात पडली. तसेच एमआयएमच्या दोन नगरसेवकांनीही शिवसेनेला मतदान केले. एमआयएमचे औरंगाबाद महापालिकेमध्ये २५ सदस्य असून एक सदस्य गाव सोडून गेले आहेत, तर सय्यद मतीन हे नगरसेवक  सध्या कारागृहात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीमधील सर्व सदस्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या दोन सदस्यांच्या पाठिंब्यांवर राजेंद्र जंजाळ हे उपमहापौर झाले. महापालिका निवडणुकीसाठी केवळ तीन महिने असताना घडलेले हे राजकीय बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 4:23 am

Web Title: rajendra janjal wins amc deputy mayoral poll zws 70
Next Stories
1 ‘सन्माना’चे सहा हजार विना ‘आधार’!
2 निष्ठा कमावलेली..!  बदललेली..
3 मराठवाडय़ाच्या वाटय़ाला पाच कॅबिनेट, दोन राज्यमंत्रीपदे
Just Now!
X