साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा आदर्शसमोर ठेवून समाजातील युवकांनी आणि महिलांनी उच्चशिक्षण घ्यावे. महिलांच्या शिक्षणाची सोय इतिहासात करण्यात आली होती. आताच्या आधुनिक युगात वावरतांना महिलांनी शिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी (दि.५) केले.

महसुल प्रबोधिनीच्या सभागृहात क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषदेने आयोजित केलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी व्याख्यानमाला व समाज जागृती व्हिजन २०२० कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले बोलत होते. गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज हा शिक्षणाच्या प्रवाहातून दुर गेला असून समाजाने आता शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थतीमध्ये शिक्षण घेत समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांचा आदर्श घेवून मातंग समाजातील महिलांनी उच्चशिक्षण घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान, मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या असून त्या दुर करण्यासाठी राज्यशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषदेचे उत्तमराव कांबळे, कोअर कमिटीचे अध्यक्ष बबनराव दाभाडे, प्रा.संजय गायकवाड, शहर जिल्हाध्यक्ष योगेश दणके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष कल्पना त्रिभूवन आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप मानकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदेशाध्यक्ष राजु खाजेकर यांनी मानले.