अपंग पुनर्वसनासाठी केलेल्या १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे बुधवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार बच्चू कडू यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. अपंगांना कर्जपुरवठा करावा व सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा, या साठी अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
जि.प.च्या मैदानावरून निघालेल्या मोर्चात अनेक अपंग आंदोलक सहभागी झाले होते. चारचाकी सायकलवरून आणि कुबडय़ा घेऊन मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी सरकारच्या योजनेतील त्रुटींबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. स्थानिक स्वराज्य संस्थेत तीन टक्के निधी अपंगांवर खर्च व्हावा, व्यवसायासाठी त्यांना जागा मिळाव्यात, संजय गांधी निराधार योजनेत सामावून घ्यावे, लवकर कर्ज मंजूर व्हावे व अपंग प्रमाणपत्र चार दिवसांत मिळावे अशी मागणी करण्यात आली. आयुक्त कार्यालयासमोर मोर्चाला अडविण्यासाठी पोलिसांनी बॅरीकेट लावले होते. मात्र, नंतर ते पोलिसांनी काढून घेत आंदोलकांप्रती सहानुभूती व्यक्त केली. आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी अपंगांचे प्रश्न समजून घेतले.