लातूर शहराच्या पाणी प्रश्नी राष्ट्रवादीने विरोधी भूमिका घेतल्याने प्रश्न जटील बनल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी केला. त्यावर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी काँग्रेस खासगीकरणाचा घाट घालत असल्याने राष्ट्रवादीचा विरोध लातूरकरांच्या हितासाठीच असल्याचे सांगितले. उजनीहून लातूरला थेट पाणी मिळावे, यासाठी काँग्रेसने नागपूर येथे धरणे आंदोलन केले. त्यामुळे लातुरात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
नागपूर येथे धरणे आंदोलन करताना सर्वपक्षीयांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल, अशी भूमिका महापौर अख्तर शेख यांनी मांडली होती. मात्र, राष्ट्रवादीने काँग्रेसच्या भूमिकेवर प्रखर टीका केली. ४० वष्रे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना पाणी प्रश्नासंबंधी काही केले नाही. आता थेट विधान भवनासमोर धरणे धरण्याचे नाटक करून काय साध्य होणार, असा सवाल मकरंद सावे यांनी केला. प्रत्येक टप्प्यावर लातूरकरांच्या पाणी प्रश्नासंबंधी सत्ताधारी काँग्रेसने गांभीर्य दाखवले नाही, सत्ता हाती असूनही सदोष पाणी प्रश्नी काही उपाययोजना केली नाही. पाणी मिळवण्यासाठी दूरदृष्टी दाखवली नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे काँग्रेसची मंडळी अतिशय संतप्त झाली.
काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी राष्ट्रवादीने कायम विरोधासाठी विरोध ही भूमिका घेत पाणी प्रश्नी वेळोवेळी अडथळेच आणले. त्यामुळे प्रश्न चिघळला. लातूरकरांना मीटरने पाणी देण्याची आमची भूमिका होती. लोकांना वेळेवर पाणी मिळाले तर श्रेय काँग्रेसला मिळेल यामुळे खोटेनाटे आरोप करत लोकांची दिशाभूल केली. त्यामुळे नळाला मीटर बसवता आले नाहीत. पाण्याचा प्रश्न सुटण्याऐवजी तो चिघळत कसा राहील यावरच राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले होते व आता पुन्हा आमच्यावरच ते आरोप करत आहेत. तेव्हा त्यांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही अग्रवाल यांनी दिला होता. त्यालाही सावे यांनी उत्तर दिले.
सावे म्हणाले की, नळाला मीटर बसवण्याच्या नावाखाली पाण्याचे खासगीकरण करण्याची काँग्रेसची योजना होती. त्यातून गरीब माणसाला पाणी विकत घेणे परवडणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली असती.  केवळ त्यामुळे पाण्याच्या खासगीकरणाला विरोध केला. नळाला मीटर बसवण्यास आम्ही कधीच विरोध केला नाही. पाण्याचे श्रेय लाटण्यासाठी काँग्रेस केविलवाणी धडपड करत आहे.
शिवसेनेच्या वतीनेही काँग्रेसचे नागपूर येथील धरणे आंदोलन म्हणजे नाटकबाजी म्हटले आहे. आपल्या काळात जे जमले नाही, त्यावर पांघरुण घालण्यासाठी काँग्रेसची मंडळी धरणे आंदोलन करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. भाजपाने उजनीहून लातूरकरांना थेट पाणी देण्यासाठी आजपर्यंत कोणीच काही केले नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लातूरकरांच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्र्यांनी टाकलेले सकारात्मक पाऊल हे लातूरकरांची पाण्याची चिंता कायम दूर व्हावी यासाठीच असल्याचे म्हटले आहे.