लखनौचे मौलाना आसूब अब्बास यांची टीका

डिसेंबर आला की नोव्हेंबरपासून राम मंदिर व बाबरी मस्जिदचा मुद्दा मुद्दामहून काढला जातो. या मुद्यावर नेमके आताच श्री श्री रविशंकर यांना चर्चा करावीशी वाटतेय, त्यामागे प्रसिद्धीसाठीचा खटाटोप असल्याची टीका लखनौ येथील शिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना आसूब अब्बास यांनी येथे केली. चर्चेसाठी ‘श्री श्री’ यांचा निरोप आला होता. मात्र, तुमच्याकडे काही प्रस्ताव असला तर सांगा असे म्हणताच त्यांनी नकार दिल्यामुळे प्रत्यक्ष आमच्यात कुठलीही चर्चा झाली नाही. भेटीत केवळ फोटो काढले जातात आणि भलतीच चर्चा होते, असेही ते म्हणाले.

येथे एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आलेले मौलाना आसूब अब्बास यांनी राम मंदिर, बाबरी मस्जिद, त्यावरून होणारे राजकारण, गुजरातच्या निवडणुका, गोवंशाच्या हत्येवरून होणारे हल्ले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा, आदी मुद्यांवर पत्रकार बैठकीत मते मांडली. या वेळी इराणच्या वकील अयातुल्ला नासेर मकारिम संस्थेचे भारतातील प्रतिनिधी मौलाना शबाब नक्वी, एजाझ झैदी, डॉ. दिलशाद झैदी आदींची उपस्थिती होती.

मौलाना आसूब अब्बास म्हणाले, दोन दिवसांपूर्वी अमरनाथ मिश्रा यांचा मला फोन आला. त्यांनी श्री श्री रविशंकर हे तुमच्याशी राम मंदिर, बाबरी मस्जिद वादाच्या पाश्र्वभूमीवर चर्चा करणार असल्याचा निरोप दिला. आपण त्यांना श्री श्री रविशंकर यांच्याकडे कुठला तोडगा आहे का, असे विचारले. मात्र, कुठलाही तोडगा सध्या तरी नाही म्हणताच आपण भेटण्यासाठी नकार दिला. दोन धर्मातील व्यक्ती भेटतात आणि त्यातून केवळ फोटोसेशन होऊन वेगळ्याच चर्चा, वादाला तोंड फोडले जाते. त्यामुळे आपण श्री श्री यांची प्रत्यक्ष भेट घेतली नाही. श्री श्री यांचा सारा खटाटोप हा प्रसिद्धीसाठी आहे. या मुद्याच्या माध्यमातून श्री श्री हे प्रसिद्धीच्या केंद्रस्थानी येतात आणि त्यांना ते हवे असावे, अशी टीका मौलाना आसूब अब्बास यांनी केली. देशातील हिंदू व मुसलमानांना परस्परांसोबत भांडण्यात कुठलेही स्वारस्य नाही. राजकारणासाठी मंदिर, मस्जिदचा मुद्दा छेडला जातो आणि तो नोव्हेंबर-डिसेंबरच्या मध्यात. इतरवेळी या मुद्दावर कोणी चर्चा करीत नाही. मुस्लीम समाजातीलही काही व्यक्ती या मुद्यावर वक्तव्य करून वादासारखी परिस्थिती निर्माण करीत आहेत. त्यांच्यामागे काही अशांतता पसरवणाऱ्या शक्तींचे पाठबळ असावे, असेही मौलाना अब्बास म्हणाले. सध्या गुजरातच्या निवडणुका आहेत, त्या पाश्र्वभूमीवरही मंदिर-मस्जिदचा मुद्दा पुढे करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आहे का, या प्रश्नावर मौलाना म्हणाले, धर्म वेगळा आहे आणि राजकारण वेगळे. मात्र दोन्हींची सरमिसळ करून राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार होत आलेले आहेत. मात्र देशातील हिंदू-मुस्लिमांना परस्परांमध्ये लढण्यात काहीही स्वारस्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ, सबका विकास हे ब्रीद वाक्य निर्णय प्रक्रियेतून खरे करून दाखवावे, असे आवाहनही केले.

न्यायालयाचा निर्णय मान्य करू

राम मंदिर-बाबरी मशीदचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात आहे. तेथे सर्व पुराव्यांची कागदपत्रे सादर केलेली आहेत. न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वमान्य असेल. त्याचा आम्ही आदरच करू, असे मौलाना अब्बास म्हणाले.