17 January 2019

News Flash

वैज्ञानिक दृष्टिकोनातून साकारलेले वाल्मीकी रामायण

हजारो वर्षांपासून भारतीय समाजमनावर रामायणासारख्या महाकाव्याचे गारुड निर्माण झालेले आहे.

औरंगाबाद येथे डॉ. माधवराव चितळे यांच्या वाल्मीकी रामायणावरील प्रवचनाच्या पुस्तकाचे प्रकाशन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते झाले

राज्यपाल राम नाईक यांचे प्रतिपादन

हजारो वर्षांपासून भारतीय समाजमनावर रामायणासारख्या महाकाव्याचे गारुड निर्माण झालेले आहे. श्रद्धा, भक्ती, कर्तव्यधर्म शिकविणाऱ्या या महाकाव्यातून संस्कृतीचा अलंकार लाभला आहे. वेगवेगळ्या शतकात समोर आलेल्या रामायणाचे स्वरूप भिन्न जरी असले तरी त्यातून श्रद्धेची रुजवात झाली आहे. तुलसीदासांचे रामचरित मानस, गदिमांचे गीतरामायण जसे तसेच आधुनिक विज्ञानयुगातील आणि २१ व्या शतकातील म्हणून माधवराव चितळे यांचे वाल्मीकी रामायण हे वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले.

ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या ८८ प्रवचनाचे लिखित स्वरूपात साकारण्यात आलेल्या वाल्मीकी रामायण या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. चितळे, प्रकाशक, लेखक बाबा भांड, संपादिका आशाताई देवधर, विजयाताई चितळे यांची उपस्थिती होती.

संघ स्वयंसेवकांपासूनच्या मैत्रीचा उल्लेख करत राम नाईक यांनी माधवराव चितळे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखविले. रामायणाकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पाहण्याची नितांत आवश्यकता होती. रामायणातील घटना, संदर्भाचे वैज्ञानिक महत्त्व आजपर्यंत सखोलपणे समोर आले नव्हते. डॉ. चितळे यांच्या अभ्यासूवृत्तीने नवीन रामायण समोर आले आहे.

परिश्रमातून मिळविलेले सर्व ज्ञान, अनुभव हा समाजकारणासाठी लावणे मोठे कठीण काम असते आणि ते माधवरावांनी पार पाडले आहे. या नव्या वाल्मीकी रामायणाचे महत्त्व केवळ मराठीपुरतेच न राहता इतरही भाषेत भाषांतरित व्हावे आणि उत्तम राज्यकारभाराचे महत्त्व इतर प्रांतापर्यंतही पोहोचावे, अशी अपेक्षाही नाईक यांनी व्यक्त केली. त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

डॉ. माधवराव चितळे यांनी रामायणातील घटना संदर्भाचे महत्त्व आजही कसे दिसून येते, हे अनेक दाखले देऊन उलगडून दाखविले. रामायणाचे महाकाव्य हे केवळ भारतापुरतेच मर्यादित नसून मलेशिया, इंडोनेशिया या देशातही त्याचे महत्त्व असल्याचे  सांगितले.

 

इंडोनेशियातील परिषदेत रामायणाचा संदर्भ

डॉ. माधवराव चितळे यांनी १९८६ साली इंडोनेशियात धरणांच्या आढावा बैठकीचा संदर्भ देत तेथे प्रकाशित एका पुस्तिकेवर नल या वानराचा सेतू बांधण्यासाठी मार्ग दाखवतानाचा फोटो प्रकाशित केल्याचे सांगितले. तसेच मलेशिया व अन्न व औषध संघटनेच्या जागतिक कार्यालयातील भोजनालयात रामायणाच्या घटनांचे संदर्भ दाखविणारे चित्र आढळल्याचे सांगून रामायणाचा जागतिक मानसिकतेवरही प्रभाव असल्याचे सांगितले.

First Published on November 27, 2016 1:16 am

Web Title: ram naik published book on valmiki ramayana