मुंबईत फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचं रामदास आठवले यांनी समर्थन केलंय. लोकांना त्रास होत असेल अशा ठिकाणी फेरीवाल्यांनी बसू नये, मात्र त्यासाठी पालिकेने स्वतंत्र व्यवस्था करून द्यायला हवी. मनसेचे कार्यकर्ते दमदाटी करत असतील, फेरीवाल्यांवर हल्ले करत असतील तर फेरीवाल्यांनी देखील प्रतिहल्ले करावे , असं वादग्रस्त वक्तव्य आठवले यांनी केलंय. फेरीवल्यांवर दमदाटी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांना लष्करात भरती करुन पाकिस्तानवर हल्ला करा, असा टोला आठवले यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला. औरंगाबादमधील सुभेदारी विश्राम गृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आगामी गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी मत व्यक्त केले. गुजरातमधील उनाच्या प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोखठोक भूमिका मांडली. त्यामुळे गुजरातच्या आगामी निवडणुकीत दलित जनता भाजपच्या विरोधात जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय मुस्लिम मतदार काँग्रेसला साथ देतील असे वाटत नाही, असेही ते म्हणाले. गुजरात आणि हिमाचाल प्रदेश निवडणुकीत राहुल गांधींनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसला यश मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी संजय राऊत यांनी राहुल गांधी पप्पू राहिले नाहीत, या वक्तव्यावरही त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींपेक्षा उद्धव ठाकरे हुशार आहेत, असे ते म्हणाले. मायावती रिपब्लिकन पक्षात येत असतील तर त्यांना अध्यक्षपद देण्यासाठी पाठिंबा असेल, असे ते म्हणाले. आठवले यांनी आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज असल्याचे मत देखील व्यक्त केले. आरक्षण हे देखील दलितांवरील अत्याचाराचे एक कारण आहे. मराठा, पाटीदार आणि जाट समाजाला आरक्षण देण्याला विरोध नाही. पण त्यांना ओबीसीत समाविष्ट न करता वेगळी वर्गवारी करावी. सर्वांना २५ टक्के आरक्षण देण्यात यावं. दलितांना मिळणाऱ्या आरक्षणाला विरोध न करता आरक्षण देण्यात येत असेल तर आंबेडकरवादी जनतेचा या आरक्षणाला विरोध नसेल. त्यासाठी संसदेत कायदा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असे ते म्हणाले.