औरंगाबाद : शिवसेना-भाजपने युती करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची अवहेलना केली आहे. एका अर्थाने अन्याय आहे. लोकसभेची दक्षिण मध्य मुंबईची जागा मागितली होती, मात्र ती शिवसेनेच्या कोटय़ात असल्यामुळे ती मिळणार नाही, असे वाटते आहे. गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला दिलेल्या आठही जागा युतीमधील शिवसेनेच्या वाटय़ात आहेत, त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी युतीनंतर नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद येथे ते पत्रकार बैठकीत बोलत होते. कोणत्याही स्थितीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

दक्षिण मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा होती. खासदार संजय राऊत, शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्याकडे तशी मागणीही केली होती. युती होताना त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. युतीची घोषणा होण्यापूर्वी साधा दूरध्वनीही केला गेला नाही. आता ४८ जागांचे वाटप झाले आहे. शिवसेनेला पालघरची जागाही देण्यात आली आहे. पूर्वी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आठ जागांपैकी अंबरनाथ, पिंपरी, चेंबूर या भागांत आरपीआयचे नेते थोडय़ा मतांनी पडले होते. आता बहुतांश जागा शिवसेनेच्या वाटय़ात आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला स्थान दिले जाईल असे सांगितले होते. तो मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. महामंडळाचे अध्यक्षपद व संचालकपद मिळावे अशी यादीही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिली होती, पण तेथेही अन्यायच झाला. त्यांच्याही कार्यकर्त्यांना महामंडळाचे पद मिळाले नाही, हे खरे आहे. पण युती होताना रिपब्लिकन पक्षाचा विचार न करणे ही अवहेलना आहे आणि अन्यायही आहे, असे आठवले म्हणाले.

युतीतील नेत्यांनी दिलेली वागणूक अवहेलना आणि अन्यायकारक असली तरी तो अपमान नाही, असेही आठवले एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

२५ फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांची बैठक

कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार देत आठवले म्हणाले, की माझा स्वतंत्र पक्ष आहे. कमळ जरी फुलत असले आणि कमळ फुलावे अशी जाहीर भूमिका जरी घेत असलो तरी कमळ चिन्हावर मी निवडणूक लढणार नाही. तसे केले तर मी निवडणुकीत पराभूत होईन, असेही आठवले म्हणाले. नाराज आठवले यांच्याशी युतीची घोषणा झाल्यानंतरही एकाही नेत्याने दूरध्वनीवरून संपर्क साधला नाही. आता माझी नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी केलेल्या कामाचे आठवले यांनी कौतुक केले.

ईशान्य मुंबईकडे लक्ष

दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यास किंवा त्यात खूपच अडचणी निर्माण झाल्यास खासदार किरीट सोमय्या यांचा ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपने द्यावा. यापूर्वी या मतदारसंघातून एकदा निवडणूक लढलो होतो. त्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी व्यक्त केली.