मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पोलीस आयुक्तालयात बैठक घेण्याच्या कृतीची दखल पालकमंत्री रामदास कदम यांनी घेतली. झालेला प्रकार मलाही खटकला आहे. महापालिकेतील वसुली प्रक्रिया हा पोलीस आयुक्तांचा प्रश्न नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कानी हा प्रकार घालू, असेही पालकमंत्री कदम यांनी सांगितले. १ हजार ४०० शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्य सरकारने मोफत बियाणे वाटपाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही व अन्य योजनेतूनही त्यांना लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याच्या निर्णयास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्यात सुमारे १ लाख असे वंचित शेतकरी असू शकतात. त्यांना या योजनेचा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वसुलीसाठी पोलीस संरक्षण घेतले जात असल्याच्या कृतीची अधिक माहिती घेऊ, असेही त्यांनी सांगितले.