मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांचे मत

भारतातील लोकशाही मान्य केली तर मत-मतांतरे ही व्यक्त होणारच. ती व्हायलाही हवी. त्यातून सकारात्मक व नकारात्मक विचारांची चर्चा होत राहील. त्याला वादाचा रंग चढेल. पण हे वाद तात्कालिक असतात. त्यांना त्याच नजरेतून पाहावे. संमेलन कालावधीपुरते. संमेलनाकडे एक उत्सव, प्रबोधनामृताचा डुबकी मारणारा डोह, याच अर्थातून पाहायला हवे, असे मत ३९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांनी नोंदवले. संमेलने नसतील तर नवोदित कवी, लेखकांनी कुठे जाऊन त्याचे प्रकटीकरण करावे, त्यांना व्यासपीठ कोण देईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

अंबाजोगाई येथे २४-२५ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर ते ‘लोकसत्ता’शी बोलत होते. प्रा. रंगनाथ तिवारी यांनी साहित्य, संमेलनावरून होणारे वाद-प्रतिवाद, मराठवाडय़ातील शेती, शेतकरी आत्महत्या, सिंचन समस्या, समाज, नव्याने इतिहास लिहिण्यासंबंधी निघत असलेला सूर, शिक्षण पद्धती, महापुरुष, पौराणिक व्यक्तिचित्रण व महाराष्ट्राचे स्वतंत्र विभाग करण्याविषयी वेगवेगळे येणारे मतप्रवाह, यावर आपली मते, निरीक्षणे नोंदवली.

समाज, साहित्याकडे कुठल्या नजरेने लेखक आणि साहित्यावर प्रेम करणाऱ्या चोखंदळ, अभ्यासू रसिकांनी पाहावे, यावर बोलताना प्रा. तिवारी म्हणाले, आज मराठीत अनेक उत्तमोत्तम लेखक, साहित्यिक विविधांगी विषयांना हात घालून लिहिते झाले आहेत. अनेक प्रतिभावान कवी पुढे येत आहेत. त्यांना याच त्यांच्या बहरत असलेल्या प्रतिभा काळात व्यासपीठ मिळाले नाही तर ते कोठे वाचन सादर करतील? कोठे सादरीकरण करतील? त्यासाठी संमेलनाचे माध्यम आहे.

या निमित्ताने वर्षभरात साहित्याविषयीची जवळीक, प्रेम दाखवण्याची मनात गुरफटलेली हुरहुर बाहेर पडते. नाहीतर दिवसामागून दिवस हे टीव्हीसारख्या ‘इडियट बॉक्स’समोर बसूनच जात आहेत. काळ पुढे सरकत आहे. नवे विचार काही मिळत नाहीत. त्याच-त्याच साचेबद्ध जीवनप्रणालीत माणूस अडकून पडलेला दिसतो आहे. अशा वेळी विचारांची नवसंजीवनी मिळण्यासाठी साहित्य संमेलनासारखे उपक्रम आवश्यक ठरतात. त्याला उत्सवाचे स्वरूप आले पाहिजे. त्यातला साहित्यानंद उपभोगता आला पाहिजे. सर्जनतेच्या पातळीवरही नवा विचार, नवी दृष्टी आपण साहित्य संमेलनातूनच घेऊन जातो. एका अर्थाने ती शिदोरीच आहे. संमेलनातून मिळालेला विचार, नवा शब्दालंकार लेवून माणूस परततो. ते कधी-ना-कधी त्याला उपयोगी पडतात. नवी ऊर्जा निर्माण होते. ती प्रेरणा देते. जगण्याला ऊर्मी, नवी दृष्टी देते, असे प्रा. तिवारी म्हणाले.

समाजात घडणारे काही विषय हे साहित्यबाह्य़ आहेत. आत्महत्या या निसर्गाच्या बदलत्या ऋतुमानाचा परिणाम आहे. जीवनप्रणालीतही बदल होत गेला. खर्च करण्याकडे वृत्ती वाढत गेली. त्या तुलनेत आवक कशी आहे याचा अंदाज घेतला जात नाही. पूर्वीचा समाज आपल्या कुवतीप्रमाणे राहात होता. आज पाहिले तर समस्येला तोंड देण्याची हिंमत राहिली नाही. ओढून ताणून त्या विषयांना साहित्यात आणावे, असे वैयक्तिक पातळीवर मला वाटत नाही. सिंचन समस्येबाबत बोलताना प्रा. तिवारी म्हणाले, नदीजोड प्रकल्पाची संकल्पना १९२० मध्येच मांडण्यात आली आहे. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने गंगेचे पाणी कावेरीत सोडण्याविषयी आपले मत व्यक्त केले होते. सिंचनासारख्या काही मोठय़ा प्रकल्पासाठी सैन्यदलाच्या ऊर्जेचा उपयोग करून घेतला तर पाच वर्षांत देश सुजलाम-सुफलाम होईल.

इतिहासाचे नवे पैलू समोर यावेत

यदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांनी संस्कृतमध्ये लिहिलेली अनेक पत्रे समोर आणली आहेत. शिवरायांची स्वातंत्रेच्छा त्यातून समोर आली. अनेक हिंदू सरदारांना त्यांनी पत्रातून इच्छा कळवली होती. अशा पत्रांतून इतिहासाचे नव्याने पैलू समोर येतील. ऐतिहासिक सत्य बदलता कामा नये. तो अधिकार कोणालाही नाही. ऐतिहासिक सत्याचा विपर्यास होता कामा नये. दुराग्रहाने लिहिणे चुकीचे आहे. लेखकांनी लक्ष्मणरेषा ओलांडायची नसते. समाज, धर्म, देशासाठीही त्याचा वापर करायचा नसतो. इतिहास हा साहित्याचा प्रश्न आहे. इतिहासातील पराक्रमी व्यक्तींच्या चरित्राचा समावेश शिक्षण पद्धतीत यावा. जरूर यावा. काही पौराणिक व्यक्तिरेखा मोठय़ा केल्या गेल्या. त्यातला वास्तविक संदर्भ विचारात घ्यायला हवा. निष्कारण एखादी व्यक्ती मोठी होता कामा नये. तसे असेल तर अनुचित आहे, असे प्रा. तिवारी म्हणाले.

प्रा. तिवारी यांची साहित्य संपदा

संपल्या सुरावटी, उत्तम पुरुष एकवचन, देवगिरी बिलावल (मराठी व हिंदी), बेगम समरु, अनन्वय, गुरुदेव (कादंबरी), देवगिरी बिलावल (संगीत नाटक), काया-परकाया (नाटक), मौनाची महासमाधी (कथासंग्रह), बिढार (हिंदी अनुवाद) निशिगंधा (इंग्रजीतून अनुवादित), सरधाना की बेगम, उत्तरायण (हिंदी कादंबरी), शून नलिनी आदी.

भाषा, प्रांतवाद राजकारणाचा भाग

मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे, यावर निघत असलेल्या सुरावर बोलताना प्रा. तिवारी म्हणाले, प्रांतीक, भाषावाद हा राजकारणाचा एक भाग आहे. त्यात साहित्यिकाला भूमिका आहे, असे मला वाटत नाही. वेगळी चूल कशासाठी मांडायची, असा प्रश्न प्रा. तिवारी यांनी उपस्थित केला.

पुरस्कार

राष्ट्रभाषा रत्न पुरस्कार १९५४, साहित्य रत्न उपाधि १९५७, मानव संसाधन मंत्रालयांतर्गतचा हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार, म्हैसूर येथील भाषा भारती पुरस्कार, महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीचा छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार, दिल्ली येथील हिंदी भवनचा राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन स्मृती हिंदी रत्न पुरस्कार, देवगिरी बिलावलला शासनाचा हरी नारायण आपटे, वि. स. खांडेकर, लोटू पाटील पुरस्कार, पूर्णवाद परिवाराचा रसिकराज आबासाहेब मुजुमदार पुरस्कार, अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार.