वाळूज, शेंद्रामधील अनेक कंपन्या प्रभावित

कंपन्यांमधील संगणकात ठेवलेल्या माहितीच्या साठय़ावर रॅन्समवेअर व्हायरसच्या माध्यमातून होत असलेल्या हल्ल्याने औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात खळबळ सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका कंपनीची माहिती हॅक करण्यात आली असून संबंधितांना ऑनलाइन खंडणी मागणाऱ्या धमकीचा मेल आला आहे. पोलिसांची सायबर क्राइम शाखाही तज्ज्ञ व अत्याधुनिक माहिती यंत्रणेच्या अभावामुळे रॅन्समवेअरचा हल्ला परतवून लावण्यासाठी सक्षम नसून अनेक उद्योग प्रभावित झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

औरंगाबादजवळील वाळूज येथील एका कंपनीला शनिवारी पहाटे एक मेल आला. त्यातून त्यांनी कंपनीची सर्व माहिती रॅन्समवेअर व्हायरसने प्रभावित केल्याचे कळवले. कंपनीला संबंधित ऑनलाइन खंडणी बहाद्दरांनी एका संकेतस्थळावर ई-टेलिग्राम करण्याचे सांगितले आहे. धमकीचा मेल आलेल्या कंपनीने एका संकेतस्थळावर ई-टेलिग्राम पाठवावा, असे मेलद्वारे कळवले आहे. त्यामाध्यमातून हे खंडणीखोर बिटक्वॉईन, पे-टीएमद्वारे मोठय़ा रकमेची मागणी करतात, असे हॅकर्सचे म्हणणे आहे. कंपनीने आता सायबर क्षेत्रातील खासगी तज्ज्ञांशी संपर्क केला आहे. ही कंपनी एका मोठय़ा कंपनीला सुटय़ा भागाचा पुरवठा करते. वाळूजमधील रॅन्समवेअरचा हल्ला झालेली एकमेव कंपनी नसून अशा अनेक कंपन्या प्रभावित झाल्या आहेत. मात्र त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क साधला नाही. सायबर क्राईमला आवश्यक असणारी फायर वॉल, आयडी सुरक्षितता, सेक्युरिटी ऑडिटिंग, पेड्रिटेशन पेट्री, अशी यंत्रणा आवश्यक असली तरी त्याचा अभाव असल्याने तपासाच्या मुळापर्यंत जाता येत नाही, अशी कबुलीच एका अधिकाऱ्याने दिली. तर रॅन्समवेअरबाबत सायबर गुन्ह्य़ाचे अभ्यासक, पाथरी येथील पोलीस उपनिरीक्षक काझी आवेझ मकसूद अहमद यांनी सांगितले की, या व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही परभणीसह इतर ठिकाणी जनजागृती कार्यशाळा घेतल्या आहेत. विशेषत विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती दिली. माहितीचा साठा, ऑनलाइन-ऑफलाइन डाटा सांभाळणे, फाईलवर कसा ताबा मिळवायचा, याची माहिती दिली जात आहे.

वाळूजमध्ये तक्रार दाखल

वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एक तक्रार दाखल झालेली आहे. पोलीस विभागाची सायबर क्राईम शाखा ही तज्ज्ञांच्या समूहाशी संपर्क साधून एखाद्या कंपनीची माहिती साठा नष्ट केला असेल तर संबंधितांचा शोध घेते. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना रँडसमवेअरसारख्या व्हायरसचा धोका संभवतो. औरंगाबादेतून फार तक्रारी दाखल नाहीत.  – गजानन कल्याणकर, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम.

रॅन्समवेअरचे नवीन रूप बाजारात

रँडसमवेअरचे नवीन रूप दाखल झालेले आहे. बॅडरॅबिट असे नाव आहे. हे ई-कॉमर्स, बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग क्षेत्राला व्यापत आहे. यामध्ये व्हायरस सोडला जात आहे. रॅन्समवेअरपासून काळजी घेण्यासाठी अगोदर इंटरनेट कनेक्शन काढावे. नेटवर्क अ‍ॅडमिनशी चर्चा करून माहिती घ्यावी. बॅकअप डाटा इंटरनेट कनेक्शनपासून दूर ठेवावा. सुरक्षिततेसाठी एक सॉफ्टवेअर असते ते संगणकात ठेवावे. अलीकडे अशा तक्रारी वाढल्या असून गुगलवरील माहितीनुसार १८ ते १९ देशात रॅन्समवेअरे थैमान घातले आहे.  – वैभव सुहासराव कुलकर्णी, हॅकर्स.