News Flash

रावसाहेब दानवे यांना पुन्हा तेच खाते!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काही दिवस काम केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून फारशी छाप पाडू न शकलेल्या रावसाहेब दानवे यांना केंद्रात राज्यमंत्रिपद आणि पुन्हा आधी सांभाळलेली ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा ही खाती सोपवून भाजप नेतृत्वाने त्यांचे एक प्रकारे राजकीय पुनर्वसनच केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा मराठवाडय़ाकडे कायम राहते का याची उत्सुकता आहे.

पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. सर्वसामांन्य मतदारांशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली आणि ग्रामीण बेरकीपणा ठासून भरलेला नेता अशी ओळख असणारे दानवे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात बहुतांश सर्व निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले. बोलण्यातील अघळपघळपणामुळे नेहमी वादामध्ये अडकणाऱ्या दानवे यांच्या विरोधातील नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई करून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंड निपटून काढले. त्यानंतर दानवे जालना मतदारसंघातून तीन लाख ८३ हजार मतांनी निवडून आले. विक्रमी मतांनी निवडून आल्यानंतर त्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळेल, असा दावा त्यांचे समर्थक करत होते. पण त्यांनी काल राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांना खातेही मिळाले पूर्वीचेच. राज्यमंत्री पदावरून त्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात आले तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष झाले. आता पुन्हा त्याच पदावर, त्याच खात्यात त्यांना काम करावे लागणार आहे.

वादग्रस्त वक्तव्यामुळे दानवे वाद आणि टीकेचे धनी झाले. परंतु अलीकडच्या काळात त्यांनी माध्यमांशी बोलताना स्वतवर नियंत्रण ठेवले होते. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी संघटनात्मक बांधणी चांगली केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बूथ बांधणीच्या बैठकांमध्येही त्यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय विविध पक्षांतील अनेक नेत्यांना प्रवेश देणारे प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची ओळख होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काही दिवस काम केले. मात्र, ते दिल्लीत रमले नव्हते. प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव वाढू लागला होता. ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. मात्र, त्यांच्याभोवती नेहमी वाद उभे राहत. लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे जावई हर्षवर्धन जाधव यांना त्यांनी मागच्या दाराने मदत केली. परिणामी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खरे यांचा पराभव झाला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. जाधव यांनी मराठा मतांचे ध्रुवीकरण करत निवडणूक लढविली होती. त्यामुळे जातीच्या राजकारणाची किनार दानवे यांच्या राजकारणालाही असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मागास मराठवाडय़ाचे दिल्लीत नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते या भागातील प्रश्न कसे सोडवतात, याची उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 2:44 am

Web Title: raosaheb danve again get same ministry
Next Stories
1 न्यायालयात साक्ष देऊन परतणाऱ्या युवकांवर तलवारीने हल्ला
2 औरंगाबादच्या युवकांची भृगु लेक मोहीम
3 तहानलेल्या मराठवाडय़ाला दिलासा
Just Now!
X