भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याभोवती नेहमीच वादाचे रिंगण कायम राहिले. ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाहकच वाटणाऱ्या भाजपच्या ‘भक्त’ कार्यकर्त्यांना गप्प करण्यासाठी रावसाहेब दानवे यांचे नाव पुढे करता यावे, एवढय़ा वादात ते अडकल्याचे चित्र दिसत आहे.

कोणतेही संवैधानिक पद नसताना दानवे यांनी मुंबईमध्ये मंत्र्यांच्या शेजारी बंगला मिळविला. तो वाद मिटतो न मिटतो तोच त्यांच्या भोकरदनमधील अल्पउत्पन्न गटाच्या जमिनीवरील आलिशान बंगल्याचा वाद पुढे आला. या बंगल्यातील स्वीमिंग पुलामध्ये ऐन दुष्काळात त्यांनी टँकरने पाणी आणले. या दोन्ही आरोपांचे खुलासे कसेबसे करतात न करतात तोच त्यांना मंजूर केलेल्या पाच महाविद्यालयांचा वाद चर्चेत आला. भोकरदनमधील पाच महाविद्यालये मंजूर करताना अनेक नियमांना तिलांजली देण्यात आली. विद्यापीठाच्या संलग्नीकरण समितीने महाविद्यालयाना मंजुरी देऊ नये, अशी शिफारस करूनही त्यांना महाविद्यालयांची खिरापत देण्यात आली. विशेष म्हणजे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण विभागाच्या या कृतीचे समर्थन केले. पुढे प्रदेशाध्यक्ष बोलत गेले आणि कधी ‘लक्ष्मीदर्शन’ तर कधी ‘रडतात नुसते साले’ या त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय पटलावर गोंधळ उडत आहे.

मराठवाडय़ामध्ये दानवे यांची ओळख अघळपघळ बोलणारा माणूस अशीच आहे. सलग सहा वेळा निवडून येणारा भाजपचा हा नेता त्यांच्या मतदारसंघामध्ये मात्र कमालीचा लोकप्रिय आहे. सर्वसामान्य माणसाला त्याच्या भाषेत ‘महय़ा-तुह्य़ा’ म्हणजे ‘मला-तुला’ असे म्हणत लोकांमध्ये मिसळणाऱ्या दानवे यांना मतदारसंघातील कोणत्या गावात काय घडते, याची इत्थंभूत माहिती असते. विरोधी पक्षात असताना एका दुष्काळी दौऱ्यात शरद पवार यांनीदेखील त्यांना आवर्जून बरोबर घेतले होते. सर्वसामान्य माणसाशी बोलण्याची हातोटी असणारे रावसाहेब सत्ता आल्यानंतर मात्र बदलत गेले. त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या जुन्या आरोपांना विरोधकांनीही फोडणी दिली. तसे भोकरदन मतदारसंघात त्यांच्यावर बरेच आरोप झाले. माजी आमदार चंद्रकांत दानवेंनी त्यांचे राहते घरही अल्पउत्पन्न गटाच्या सोसायटीवर असल्याचा आरोप केला होता. याच आरोपांच्या चौकशीसाठी माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांनी उपोषणही केले होते. मात्र, रावसाहेब दानवेंविरोधात त्यांना जनमत संघटित करता आले नाही. भोकरदन नगरपालिका हद्दीतील सर्वे क्र. ३९ मध्ये सार्वजनिक उपयोगासाठी खासदार आणि आमदार निधीतून समाजमंदिर आणि शादीखाना बांधण्यात आला. ही इमारत प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या बंगल्याचा एकदम चिकटून आहे. ही इमारत पूर्ण होऊनही त्याचे हस्तांतर केले नसल्याची माहिती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविली होती. ही इमारत प्रदेशाध्यक्ष दानवे वापरतात, असा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे नेहमी करीत असतात. स्थानिक पातळीवर आरोपांबरोबरच आता बेताल वक्तव्यामुळे रावसाहेब दानवेंच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे.

गेल्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नवीन महाविद्यालयाचे २९ प्रस्ताव पाठविले होते. नव्याने सत्तेत आलेल्या भाजप सरकारने पाच महाविद्यालयांना मंजुरी दिली. त्यातील तीन महाविद्यालये दानवे अध्यक्ष असलेल्या भोकरदन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक समिती संस्थेला मंजूर करण्यात आली. अन्य दोन महाविद्यालयेही दानवे यांच्या नातेवाईकांनाच मंजूर झाली. विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने प्रस्ताव मंजुरीस विरोध दर्शवूनही शासनाने निर्णय घेतला. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी झाली. पण पुढे काही घडले नाही. प्रदेशाध्यक्षांचा ‘दबदबा’ वाढत गेला. त्यांच्या भाषणाला गर्दी नेहमीच असते. तशी गर्दी वाढली की, दानवे यांच्या भाषणाला वेगळी ‘उंची’ मिळते. पैठण नगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी मग लक्ष्मीदर्शन करून घ्या, असा सल्ला दिला. तो वादग्रस्त ठरला. पुढे त्यांच्या जिभेवरचे नियंत्रण सुटते गेले. शेवटी ते ‘उगीच रडतात साले’ इथपर्यंत येऊन थांबले आहेत.

भाजपचे मराठवाडय़ातील नेते आणि वादाची परंपराच

केवळ तेच नाही तर मराठवाडय़ातील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळय़ाचे आरोप  झाले. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे जामीनदार असणाऱ्या मद्यार्क कारखान्याच्या प्रकरणामधील कागदपत्रांचे तर विखेपाटील यांनी प्रदर्शन मांडले होते. पाणीपुरवठामंत्री बबन लोणीकर यांनी दिलेल्या शपथपत्रातील शिक्षणाच्या उल्लेखामुळे त्यांच्यावर काँग्रेस आमदारांनी आक्षेप घेतले आहेत. मराठवाडय़ातील भाजपचे नेतृत्व नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे.