औरंगाबाद : जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाल्याने औरंगाबादहून होणारी हवाई वाहतूक कमालीची रोडावली. परिणाम पर्यटनालाही होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर नवनिर्वाचित एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा मुद्दा आपण उचलून धरू, असे माध्यमांना सांगितले आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी यात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी हवाई वाहतुकीसाठी सोमवारी शहरातील उद्योजक आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या अनुषंगाने केंद्र सरकारसमोर आकडेवारी सादर करून इंडिगो, गो एअर आणि स्पाइस जेट या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सोमवारी चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाचे ज्ञानदेव साळवे, पर्यटन विकास महामंडळाचे विजय जाधव या अधिकाऱ्यांसह उद्योजक राम भोगले, मुकुंद कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. २०१३-१४ मध्ये औरंगाबादहून १२५० प्रवासी हवाईमार्गे दळणवळण करत होते. नंतर एक विमान बंद झाले आणि ही संख्या ९०० पर्यंत खाली आली. जेट एअरवेजने विमानसेवा बंद केल्यानंतर आता प्रवासी असतानाही दळणवळणाच्या सुविधा नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. किमान आणखी एक उड्डाण व्हावे आणि एक अतिरिक्त विमानसेवा सुरू व्हावी, असे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. या अनुषंगाने आवश्यक ती आकडेवारी सादर करण्याचे आदेश डॉ. कराड यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. ही सगळी प्रक्रिया केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या प्रकरणात पुढाकार घ्यावा, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. डॉ. कराड यांनी या अनुषंगाने दानवे यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दळणवळण वाहतुकीसाठी रावसाहेबांना साकडे घातले जात आहे. दुसरीकडे एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांनी लक्ष घालू असे सांगितले होते. मात्र, त्यांनी या अनुषंगाने काही करण्यापूर्वीच भाजप नेत्यांनी दळणवळण सुधारण्यासाठी प्रयत्नांना सुरुवात केली आहे.