मुदत संपल्याचे कारण देत नाफेड आणि एफसीआय यांनी शनिवारपासून शासनाच्या हमीदरानुसार होणारी तूर खरेदी बंद केली आहे. त्यामुळे उन्हातान्हात रांगा लावून बसलेल्या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील माजलगावात शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती अशोक डक यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला. आमदार अमरसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेऊन खरेदी केंद्र चालू करावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिला. गेवराईसह सर्व दहा खरेदी केंद्रांच्या परिसरात लाखो क्विंटल तूर पडून आहे. औरंगाबादेतील पैठण येथील केंद्रांवरही सुमारे दीडशे वाहने शुक्रवारपासून उभी होती.

शासनाच्या हमीदराने तूर खरेदी करण्याची मुदत १५ एप्रिल रोजीच संपुष्टात आली होती, मात्र शासनाने २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. एफसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ एप्रिलपर्यंत औरंगाबाद, जालना व नांदेड या तीन जिल्हय़ांतून ५ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलच्या हमीदराने ३ लाख १०८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तूर खरेदीसाठी औरंगाबाद, जालना व नांदेड या तीन जिल्ह्य़ांत १५ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. १९ एप्रिलपर्यंत नाफेडने औरंगाबाद जिल्हय़ातील पाच केंद्रांवरून ५७ हजार ६३१ क्विंटल तूर खरेदी केली. जालन्यातील तीर्थपुरी, अंबडसह चार तूर खरेदी केंद्रावरून १ लाख ३१ हजार ९५७ क्विंटल, तर नांदेड येथील सहा केंद्रांवर १ लाख ५२० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.  अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आलेली नाही. शनिवारी पैठण येथील सुमारे दीडशेपेक्षा अधिक तूर घेऊन आलेली वाहने परतू लागली होती. शेतकऱ्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. जालन्यातील तीर्थपुरी, अंबड येथील केंद्रांवरूनही शेतकरी आणलेली तूर परत घेऊन जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खासगी वाहनांमधून पैसा खर्च करून तूर खरेदी केंद्रांवर आणली होती. आधीच तुरीचा दर गडगडलेला. त्यात आता पिकवण्याचे सोडा, शेतापासून खरेदी केंद्रावर आणायच्याही खर्चाचा भरुदड शेतकऱ्यांना सोसावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तूर खरेदी बंद केल्याने लाखो क्विंटल तूर पडून राहणार आहे.