कळ सोसा; घराबाहेर पडू नका – महापालिका आयुक्तांचे आवाहन

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढीचा वेग जरासा अधिक झाल्याचे शुक्रवारी दिसून आले. सकाळच्या सत्रात ९१ रुग्णांची वाढ झाल्याने शहरातील करोनाबाधितांचा आकडा ८४० वर पोहोचला आहे. दरम्यान काही उद्रेक स्थळांभोवतीच विषाणू पाय पसरत असतानाही अजूनही अनेक नागरिक वलगीकरणात राहण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. आता दर दोन तासांनी गल्लीमध्ये पहारा देणारे पथक नेमण्यात आले असून एकमेकांच्या घरातून दूधही उसनवारी आणू नका. गप्पा मारण्यासाठी तसेच पत्ते आणि कॅरम खेळण्यासाठीही गल्लीमध्ये तरुण मुले एकत्र येत आहेत. सर्वाधिक रुग्ण २० ते ४० या वयोगटातील असून त्यांच्या जीवितास कोणताही धोका नाही. मात्र, त्यांच्यामुळे घरातील वृद्धांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते, असे सांगत काहीही करा पण पुढचे पंधरा दिवस घरातच थांबा, असे आवाहन महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी केले आहे.

विविध कोविड उपचार केंद्रातून परतणाऱ्या व्यक्तींचे प्रमाणही अधिक आहे. आतापर्यंत २३१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. पण काळजी घेतली नाही तर घरातील वृद्ध आणि इतर आजार जडलेल्या व्यक्तींना धोका असेल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी करोनाचाचणीच्या दुपापर्यंतच्या अहवालनानुसार सिडको भागातील एन- सहा मध्ये दोन, बुढीलेन, रोशनगेट, संजयनगर, सादातनगर, भावसिंगपुरामधील भीमनगर, वसुंधरा कॉलनी, कैलासनगर, प्रकाशनगर, हुसेननगर, हनुमाननगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण करोनाबाधित असल्याचे अहवाल आले आहेत. शुक्रवारी सर्वाधिक रुग्ण  हुसेन कॉलनीमधील असल्याचे दिसून आले.  या मोहल्ल्यातून नव्याने १५ जणांना लागण झाली आहे. तसेच हिमायतनगर, सील्कमील कॉलनी या भागातही करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.

शहरातील काही भागात या विषाणूचा प्रसार काहीसा आटोक्यात आल्याचा दावा महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी केला आहे. ७० वस्त्यांपैकी रोशनगेट, बिसमिल्लाह कॉलनी, कैलाश नगर, किलेअर्क, एन-सहा भागात आता मोजकेच रुग्ण सापडत आहेत. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचीच तपासणी केली जात असून बहुतेक रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णसंख्या वाढली तरी त्यांच्यावर उपचार केले जातील, अशी बांधणी जवळपास पूर्ण केल्याचेही आयुक्त पांडेय म्हणाले.

आणखी एका पोलिसाला करोना

औरंगाबाद पोलीस विभागातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. यापूर्वी एक पोलीस निरीक्षक व पोलीस आयुक्तालयात कार्यरत दोन सख्खे भाऊ असलेल्या कर्मचाऱ्यांचा करोनाचा अहवाल सकारात्मक आलेला आहे. शुक्रवारी करोनाचा अहवाल सकारात्मक आलेला हवालदार हे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांची आई दोन दिवसांपूर्वी मृत्यू पावल्यानंतर केलेल्या तपासणीत करोनाबाधित आली होती. त्यानंतर संबंधित हवालदाराची तपासणी केल्यानंतर अहवाल सकारात्मक आला. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या चार कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे विलगीकरण एका हॉटेलात केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.