21 October 2020

News Flash

आधी दुष्काळाने मारले, आता बेरोजगारीने भरडले

गाव सोडून शहरांकडे आलेल्या कुटुंबांची दशा

गाव सोडून शहरांकडे आलेल्या कुटुंबांची दशा

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

जगण्याची भ्रांत मनात साचली असताना सांडू जाधव आणि माराबाई यांच्या कुटुंबाची कृश पावले महिनाभरापूर्वी औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीकडे वळली. बदनापूर तालुक्यातील आपल्या गावाकडील म्हैस आणि बकऱ्या विकून मिळालेली पुंजी त्यांच्या गाठीशी होती. त्या पुंजीच्या जोरावर शहरात काम शोधता येईल, ही क्षीण आशा होती. परंतु दुष्काळाने विस्थापित केलेल्या अशा अनेक कुटुंबांना आता बेरोजगारीच्या झळा बसू लागल्या आहेत. कारण मंदीमुळे शहरातही हाताला काम नाही अशी परिस्थिती आहे.

दोन विवाहित मुले, सून यांच्यासह ‘बिर्ला प्रेसिंग’मध्ये हे कुटुंब कामाला लागले. लोखंडी ‘शेल’ पुसायचे आणि दीड किलोचा तो लोखंडी तुकडा उचलून न्यायचा, असे कामाचे स्वरूप. मंदी आली आणि त्यांना सांगण्यात आले ‘आता तुम्हाला काम उपलब्ध नाही.’ दुष्काळात पिचलेल्या माराबाईंसह त्यांच्या तरुण मुलांना आता काय करावे तेच समजेनासे झाले आहे. गावाकडे जायचे तर तिथेही काम नाही आणि इथेही काम नाही. जगायचे कसे, या प्रश्नाने त्यांना भंडावून सोडले (पान : महाप्रदेश) (पान १ वरून) आहे. रविवारी त्या चर्चमध्ये जातात, प्रार्थना करतात. आधी दुष्काळाने मारले आणि आता मंदीसदृश परिस्थितीने भरडले, अशी या कुटुंबाची गत झाली आहे. पण हीच गत अनेक कुटुंबांवर आल्याचा तर्क आहे. वाळुजसह औद्योगिक वसाहतीतील बेरोजगारीचा आकडा १५ ते २० हजारांच्या घरात असावा, अशी शक्यता उद्योगजगतातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये माराबाई आणि सांडू जाधवसारखी अनेक कुटुंबे आहेत. काही तरुण रोज कामाच्या शोधात निघतात. सकाळी सात वाजता घरून जेवणाचा डबा घेऊन कंपन्यांच्या प्रवेशद्वाराजवळ कामाच्या आशेने ताटकळतात. किमान २५-३० जणांना सांगितले जाते, ‘आज तुम्हाला काम नाही.’ काही तरुण दुपारच्या सत्रात काम मिळावे यासाठी प्रयत्न करतात. अखेर संध्याकाळी निराश होऊन घरी परत जातात. गेल्या तीन महिन्यांपासून औद्योगिक वसाहतीसमोर हेच चित्र आहे. तिथे रोज सकाळी काम शोधणाऱ्या माणसांचे जथ्थेच्या- जथ्थे दिसतात. त्यातील बहुतेकांना मंदी कशी येते, का येते माहीत नाही. सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे अर्थही माहीत नाहीत. माराबाई आणि सांडू जाधव यांच्यासारखे अनेकजण विशेषत: जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यातील अनेक तरुण गाव सोडून आलेले. ते आता गावी परतू लागले आहेत. ना इथे काम आहे ना तिथे, या कात्रीत ते सापडले आहेत. माराबाई आणि सांडू जाधव यांचा मुलगा प्रल्हाद, त्याची बहीण सारेजण जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराच्या मदतीने अजूनही काम मिळू शकते का, याची चाचपणी करीत आहेत. पण त्यात यश येण्याचे चिन्ह नाही.

मंदीमुळे ३० ते ३५ टक्के उत्पादन कमी झाले असल्याचे आकडय़ांतून कळते, पण त्याचा माणसांवर किती परिणाम होतो, हे माराबाई आणि सांडू जाधव यांच्यासारख्या शेकडो बेरोजगारांच्या कथा आणि व्यथांतून उघड होते.

वाहतूक निम्म्याने घटली

औरंगाबाद आणि जालन्यातून मोसंबीच्या अडीचशेहून अधिक मालमोटारी आम्ही पाठवत होतो. ती संख्या आता ५०वर आली आहे. डाळिंब उत्पादनही घटले आहे, कारण दुष्काळ! औरंगाबाद जिल्ह्य़ात मका, डाळिंब, कांदा अशा उत्पादनांची वाहतूक होत असे. तो व्यवसाय आता ५० टक्क्य़ांहून खाली आला आहे. औद्योगिक वसाहतीतून वाहतुकीसाठी मालमोटारींची मागणी निम्म्यावर आली आहे.  एक मालमोटारीचा उलाढाल झाली तर साधारणत: २० हजार रुपयांचे चलन फिरते राहते. ते सारे ठप्प आहे, असे औरंगाबाद गुड्स अ‍ॅण्ड ट्रान्स्पोर्टचे अध्यक्ष फैय्याज खान यांनी सांगितले.

सहा महिने तरी लागतील!

कामगार पुरविणारे कंत्राटदारही कमालीचे हैराण आहेत. दररोज जे १५० कामगार पुरवायचे त्यांना आता ५०-५५ कामगारांच्या हाताला काम देता येत आहे. या बेरोजगार हातांना अजून किती दिवस काम मिळणार नाही, याचे उत्तर वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये सहजपणे दिले जाते-‘ सहा महिने तरी लागतील!’

वीज वापर घटला

औरंगाबादच्या वाळुज औद्योगिक वसाहतीमधील गेल्या वर्षभरातील वीजवापर ऑगस्टअखेर तब्बल ६.३६ दशलक्ष युनिटने कमी झाल्याची आकडेवारी महावितरणकडून ‘लोकसत्ता’ला उपलब्ध झाली आहे. काही कंपन्यांनी एका दिवसाऐवजी दोन दिवस सुटय़ा दिल्या आहेत. तर काही कंपन्यांनी कामाचे तास कमी केल्याच्या चर्चेला वीज वापराच्या घटलेल्या आकडेवारीमुळे दुजोरा मिळतो आहे. सर्वसाधारणपणे १०० दशलक्ष युनिट वीज वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये वापरली जाते. त्यात गेल्या तीन महिन्यांत सातत्याने घट दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2019 2:33 am

Web Title: recession hit drought affected areas families zws 70
Next Stories
1 महाजनादेश यात्रेच्या रथावर अब्दुल सत्तार
2 मराठवाडय़ात ऊसबंदीची शिफारस
3 मराठवाडय़ासाठी १६७ टीएमसी पाणी वळविणार
Just Now!
X