छावण्यांमध्ये बनावट जनावरे दाखवली जात असल्याची तक्रार झाल्यानंतर प्रशासनाने केलेल्या उलटतपासणीत आष्टी तालुक्यात तब्बल १० हजार जनावरांची संख्या एकाच दिवसात कमी झाली. असाच प्रकार इतर ठिकाणीही आढळून आला. सरकारने मध्यंतरी छावण्या बंद करून पुन्हा सुरू केल्या, तरी या ७ दिवसांतील छावण्यांवर खर्च होणारा पसा दिला गेला. याबाबत अ‍ॅड. अजित देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर सरकारने छावण्यांचे ६५ कोटी रुपयांचे अनुदान थांबविण्याचे आदेश दिले आहेत.  बीड जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे ऑगस्टपासूनच पशुधन जगवण्यासाठी सरकारने आवश्यकतेनुसार छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले होते, मात्र राजकीय नेत्यांनी आवश्यकतेचा सोयीने अर्थ काढून कार्यकर्त्यांसाठी छावण्या मंजूर करण्याचा सपाटा लावला.  प्रशासनानेही राजकीय दबावामुळे मागेल त्याला छावणी दिली. परिणामी, छावण्यांची संख्या २७५वर गेली. या छावण्यांत सव्वातीन लाख जनावरे आश्रयाला असल्याची नोंद आल्याने दरदिवसा लाखो रुपये छावण्यांवर खर्च सुरू झाला. दरम्यान, छावण्यांमध्ये बनावट जनावरांची नोंद होत असल्याची तक्रार आल्यानंतर प्रशासनाने उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत उलटतपासणी केली. यात आष्टी तालुक्यात १० हजारांपेक्षा जास्त जनावरे एकाच दिवशी कमी झाल्याचे दिसून आले. उलटतपासणी करतानाच जनावरांची संख्या कमी कशावरून झाली? यावरून सर्वत्र छावण्यांमध्ये बनावट जनावरे दाखवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. मध्यंतरी सरकारने जिल्ह्यात चारा उपलब्ध असल्याचे सांगत छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राजकीय दबावापुढे परत सुरू करण्यात आल्या. या सात दिवसांदरम्यान नियमानुसार छावण्या बंद असतानाही अनुदान देण्यात आले. याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर तक्रार करण्यात आल्यानंतर सरकारने छावण्यांसाठीचे ६५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित न करण्याचे आदेश बजावले आहेत.