उत्तरप्रदेशी ‘साखरगोडी’ने राज्यातील कारखानदारी संकटात

साखरेच्या दरातील घसरण अजूनही सुरूच असून येत्या काही दिवसात सत्तावीसशे ते अठ्ठावीसशेपर्यंत ते खाली आलेले असतील, असा अंदाज व्यक्त करून आता घसरणारे दर २००० सालातील साखरेच्या किमतीशी मिळते-जुळते असतील, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

या वर्षी महाराष्ट्रातील ९० टक्के साखर कारखान्याने सुरू आहेत, तर तिकडे उत्तर प्रदेशने गाळपात आघाडी घेतली आहे. परिणामी महाराष्ट्रातील कारखान्यांकडून साखर घेणारे राजस्थान, मध्य प्रदेशातील काही जिल्हे, उत्तरखंड, गुजरात आदी राज्ये उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडून साखर खरेदी करीत आहेत. महाराष्ट्रातील व उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांचा दरही जवळपास सारखाच आहे. तीन हजार ते तीन हजार शंभर पर्यंतचा भाव तिथेही सुरू आहे. पाच टक्के वस्तू व सेवा कर धरला तर तीन हजारचा दर साडे अठ्ठावीसशेपर्यंत येतो. हाच दर महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांकडूनही पडतो. त्यात गाळप जोमाने सुरू आहे. परिणामी साखरेचे दर आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. कारखाना ते व्यापाऱ्यांपर्यंत येणारा दर हा सत्तावीसशे ते साडेसत्तावीसशेपर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज येथील व्यापारी नीलेश दायमा यांनी व्यक्त केला आहे. दिवाळीत सर्वसामान्य ग्राहकाने साखर ४१ ते ४२ रुपये किलोने खरेदी केलेली आहे. दिवाळी होऊन अडीच ते तीन महिने होत आहेत. या ५० दिवसात साखरेचे दर जवळपास दहा रुपयांनी कमी झालेले आहेत. औरंगाबादच्या जुना मोंढा भागातील काही व्यापाऱ्यांकडे साखर ३ हजार २०० ते३ हजार ३०० रुपये क्विंटल या दरम्यान आहे. व्यापाऱ्यांना थेट साखर कारखान्यांकडून तीन हजार रुपयांपर्यंतचा दर वस्तू व सेवा करासह पडतो. त्यात गाळप जोमाने सुरू असून उत्पादनात वाढत होत असली तरी बाजारपेठ पहिल्यासारखी राहिली नाही. परिणामी साखरेच्या दरात घसरण होतच राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.