१०८ च्या तुकडीतील अनेकांची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव

औरंगाबाद : पोलीस विभागातील १०८ च्या तुकडीतून प्रशिक्षण घेतलेल्या काही उपनिरीक्षकांमध्ये सध्या सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याची विनंती पोलीस महासंचालक कार्यालयाने अमान्य केल्यावरून खदखद पसरली आहे. ज्या कारणामुळे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा प्रश्न उपस्थित केला गेला त्याच कारणातील दुसऱ्या तुकडीतील काही अधिकाऱ्यांना मात्र बढती देण्यात आल्याचे उदाहरण पुढे आले. त्यामुळे काही उपनिरीक्षकांनी आता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २०१२ सालची परीक्षा थेट उत्तीर्ण झालेल्या १५४४ उपनिरीक्षकांनी नासिक येथील महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमीत प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणादरम्यान काही उपनिरीक्षकांची प्रकृती बिघडली. काहींना फुफ्फुसाच्या संदर्भाने तर काहींना अस्थम्याशी संबंधित आजारांचे निदान झाल्याने त्यांना वैद्यकीय चिकित्सकांकडून तीन आठवडय़ांपेक्षा अधिकच्या काळासाठी विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. यानंतर त्या आजारी पोलीस उपनिरीक्षकांना त्यांच्या विनंतीनुसार पुढील १११ च्या तुकडीत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर ते परिविक्षाधिन अधिकारी म्हणून रुजू झाले.

आतापर्यंत १०८ च्या तुकडीतील सुमारे ११०० ते १२०० पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यात आल्याची माहिती असून उर्वरित काही अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत.

मात्र ही पदोन्नती सेवा ज्येष्ठतेनुसार देताना १११ च्या तुकडीतील प्रशिक्षणानुसार देण्यात आली. त्यावर १०८ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करता न आलेल्या अधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. त्यांची १११ च्या ऐवजी १०८ च्या तुकडीनुसार सेवेत पदोन्नती मिळावी, अशी विनंती त्यांनी केलेली असून त्यासंदर्भाने काही उपनिरीक्षकांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला पत्रही पाठवले आहे. पत्रानुसार सेवा ज्येष्ठता लांबली तर पदोन्नतीचाही कार्यकाळ लांबतो. हा कार्यकाळ पाच किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षांचा असू शकतो. त्या चिंतेने १०८ च्या तुकडीतील काही उपनिरीक्षकांनी थेट पोलीस महासंचालक कार्यालयाला पत्र पाठवून उपचारानंतरच्या तुकडीऐवजी सुरुवातीच्या तुकडीनुसार सेवा ज्येष्ठता मिळावी, अशी विनंती केली आहे. मात्र ही विनंती अमान्य करण्यात येत असल्याचे पत्र त्यांना महासंचालक कार्यालयाकडून आले असून त्यावरून पोलीस विभागातील उपनिरीक्षकांमध्ये खदखद निर्माण झालेली आहे. यातील काही उपनिरीक्षकांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली आहे. त्यासाठी त्यांनी ज्या कारणांमुळे प्रशिक्षणाची तुकडी बदलावी लागली त्याच कारणाच्या आधारे तुकडी बदललेल्या १०९ मधील काही उपनिरीक्षकांना मात्र पदोन्नती देण्यात आल्याचे उदाहरण पुढे केले आहे.

नासिक येथील अ‍ॅकॅडमीत १०८ तुकडीतील २३ उपनिरीक्षकांना आजारपणामुळे प्रशिक्षण सोडावे लागले होते. जे त्यांनी १११ च्या तुकडीतून पूर्ण केले. माहिती अधिकारातून यासंदर्भातील माहिती मिळाली. मात्र २३ पेक्षा अधिक उपनिरीक्षक आजारी असण्याची शक्यता आहे. अ‍ॅकॅडमीकडून केवळ आजारी उपनिरीक्षकांच्या नावांचीच यादी देण्यात आली. अन्य माहिती देण्यात आली नाही.

– मोहम्मद उस्मान मोहम्मद इलियास, नांदेडमधील विधि महाविद्यालयाचा विद्यार्थी