अखेर कारागृह प्रशासनावर गुन्हा

औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील कैदी योगेश रोहिदास राठोड याचा मृतदेह सोमवारी सायंकाळपर्यंत ४८ तास उलटून गेल्यानंतरही ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार देत ठिय्या आंदोलन कायम ठेवले होते. सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, भाजप आमदार अतुल सावे यांनीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शवविच्छेदनगृहासमोर जाऊन नातेवाइकांची आणि आंदोलकांची भेट घेऊन मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली. मात्र हे आंदोलन निव्वळ आश्वासनावर मागे घेतले जाणार नाही, अशीच भूमिका नातेवाइकांसह आंदोलकांनी घेतली होती. दरम्यान, या प्रकरणी रविवारी मध्यरात्री हर्सूल पोलीस ठाण्यात कारागृह अधीक्षक व कर्मचाऱ्यांवर मृत योगेश राठोडचे वडील रोहिदास राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली.

आंदोलनकर्ते बंजारा समाज संघटनेचे नेते राजपालसिंह राठोड यांनी आमदार अतुल सावे यांच्याशी बोलताना सांगितले, की हर्सूल कारागृह प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला, तरी अधिकारी-कर्मचाऱ्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. मृत योगेशच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली नाही. त्याच्या पत्नीला शासकीय नोकरीत घेण्याविषयीही प्रशासनाकडून भूमिका मांडण्यात आली नाही. सोयगावच्या एका प्रकरणात दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. बंजारा समाज अल्पसंख्याक असल्यामुळेच प्रशासन प्रमुख भेट देत नाहीत. याउलट बहुसंख्य समाजातील एखादा व्यक्ती मृत झाली, तर त्यावर तत्काळ मदतीचे पत्र दिले जाते, असाही आरोप राठोड यांनी सावे यांच्यासमोर बोलताना केला. तर इतर आंदोलकांनी योगेश राठोडचा मृत्यू मारहाणीतच झाल्याचा पुनरुच्चार या वेळी केला. या प्रसंगी भाजपचे उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक प्रमोद राठोडही उपस्थित होते. या संदर्भात पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची आपण भेट घेणार असून आंदोलनातून मार्ग काढू, असे आमदार सावे यांनी सांगितले.

दरम्यान, हर्सूल कारागृहात विनयभंगाच्या गुन्ह्य़ाखाली रवानगी केलेला कैदी योगेश राठोड याचा शनिवारी रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर रविवारपासून पोलीस यंत्रणा घाटीमध्ये सोमवारी रात्रीपर्यंत तळ ठोकून होती.

अखेर आंदोलन मागे

जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांनी मृताच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेऊ व आर्थिक मदत देऊ, असे लेखी आश्वासन रात्री दिल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याची माहिती बंजारा संघटनेचे नेते राजपालसिंह राठोड यांनी दिली.

चौकशी सुरू केली

योगेश राठोडच्या मृत्यू प्रकरणाची कारागृह प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. चौकशी निष्पक्ष करण्यात येईल. कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.

– योगेश देसाई, उपमहानिरीक्षक, हर्सूल मध्यवर्ती कारागृह