औरंगाबाद : रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही. मात्र दररोज येणाऱ्या कुप्या आणि लागणारी इजेंक्शन यातील तफावतीचा लाभ घेत काही औषधी विक्रेत्यांनी त्याचा काळाबाजार सुरू केला आहे. २ हजार ८०० रुपयांचे हे इंजेक्शन आता दहा हजार ८०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. दुपटीपेक्षा अधिक रकमेला होणारी औषधे विक्री कागदोपत्री कोठेच आढळून येत नसल्याने औषध प्रशासनाचेही हात बांधले गेले आहेत. केवळ दोनच कुप्या होत्या, वापरुन संपल्या आहेत. एकच इंजेक्शन आहे, ते हवे असल्यास दहा हजार रुपये द्यावे लागतील,असे विक्रेते सांगत आहेत. रुग्णाची अवस्था पाहता कोणीही वाद न घालता पैसे देत असल्याने रेमडेसिवीरचा काळाबाजार तेजीत आहे. लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाचे सहसंचालक संजय काळे यांना विचारले असता,‘या इंजेक्शनचा तुटवडा नाही. सरासरी लागणारे इंजेक्शन मिळत आहेत. कोणालाही ते मिळाले नाही, असे होत नाही. पण त्याचा काळाबाजार होत असेल तर अशा औषध विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.’

औरंगाबादसह मराठवाडय़ातील जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. साधारणत: ५५० कुप्या रोज इजेंक्श्नची आवश्यकता असते. सध्या हा पुरवठा होत आहे. मात्र, हातचे राखून ठेवण्याच्या वृत्तीमुळे काही ठिकाणी समस्या निर्माण झालेल्या असू शकतात असे अधिकारीही मान्य करतात.

काही दिवसापूर्वी उत्पादक कंपन्यांमध्येच समस्या होती. मात्र, गेल्या सोमवारपासून पुरवठय़ामध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, मराठवाडय़ात आतापर्यंत ९८ हजार ३८९ करोना रुग्ण आढळून आले असून ७५ हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इजेंक्शनची मागणी मोठय़ा प्रमाणात आहे. पुरवठा जेमतेम असल्याने या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे.