शक्तिप्रदर्शन करत दिगंबर ढवण भाजपमध्ये

नगर शहरांतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आतापर्यंत केवळ चर्चा झाल्या. दिगंबर ढवण यांनी अनेकदा आंदोलन करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना साथ मिळाली नाही. शहराचे प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी मी व खा. दिलीप गांधी यांनी प्रयत्न केले, त्याला यश आले आहे. निवडणुका जवळ आल्यावर श्रेयाचे राजकारण होणारच. तपोवन रस्त्यासाठी मुख्यमंत्री योजनेतून मी निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री भाजपाचे असल्याने हा निधी आम्हीच मंजूर केला आहे. कोणी कितीही श्रेय घ्यायचे म्हटले तरी जनतेला हे सर्व आता माहिती आहे. उपनगरांमधील कचरा डेपो ‘त्यांनीच’ आणला. आता तेच राजकारण करत आहेत. मात्र नागरिकांचे आरोग्य या कचरा डेपोमुळे धोक्यात आल्याने उपनगरातील हा कचरा डेपो हटवणार आहे. शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी, निवडणुकीत भाजपला साथ द्या. असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.

शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख दिगंबर ढवण, नगरसेविका शारदा ढवण व सेनेचे माजी शहर उपप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी शक्ती प्रदर्शन करीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शिंदे बोलत होते. शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, गटनेते सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते श्रीराम येंडे, नरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, किशोर बोरा, नगरसेवक स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होते.

दिलीप गांधी म्हणाले, शहरात तीस वर्षांत एकही नवी वास्तू उभी राहिली नाही, खेळाडूंसाठी स्टेडियम झाले नाही, अद्ययावत मार्केट नाही, नाटयगृह नाही, ही अवस्था महापालिकेमुळे झाली आहे. आतापर्यंत मनपामध्ये सत्ता भोगणाऱ्यांनी शहर विकासासाठी कोणतेच नियोजन केले नाही. सत्तेच्या माध्यमातून फक्त ‘मला काय’ याच भावनेने काम केले. केवळ टँकरमधून ‘माल’ मिळत होता म्हणून जाणून-बुजून सरसनगर भागात पाणी सुरू केले नाही. लाखो रु पयाचा टँकर घोटाळा केला. मात्र भाजपाने केवळ दोन महिन्यात हा प्रश्न सोडवला. सत्ताधाऱ्यांनी मनपाची आर्थिक अवस्था बिकट केली. आता याचा जाब विचारण्याची वेळ या निवडणुकीत आली आहे.