योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादक कंपनीकडून काढण्यात आलेल्या कोरोनिल व इतर औषधांसंबंधीच्या केंद्राच्या आयुष मंत्रालयाकडून चाचणी घेऊन दोन आठवडय़ात वापराबाबतची स्पष्टता द्यावी, असे आदेश देत यासंदर्भात दाखल याचिका औरंगाबाद खंडपीठातील न्या. संजय गंगापूरवाला व न्या. आर. जी. अवचट यांनी सोमवारी निकाली काढली.

अ‍ॅड. पूजा दिलीप पाटील (बनकर) यांनी खंडपीठात याचिका दाखल करून करोना विषाणू किट कोरोनिल, श्वसारी व इतर आयुर्वेदिक उत्पादनांच्या वापरासंबंधी स्पष्टता द्यावी,  रामदेव बाबा यांनी तयार केलेले कोरोनिल कीट केवळ साडेपाचशे रुपयांत उपलब्ध होते.  जगात करोनाचा कहर आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिक बाधित होत असून मृत्यू होण्याच्याही घटना घडत आहेत. तेव्हा या आयुर्वेदिक स्वस्त किटने  यावर आळा बसेल. केंद्राच्या आयुष मंत्रालयाने यासंबंधी चाचणी करून निर्वाळा द्यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.