21 October 2020

News Flash

राज्यात ‘पीपीई’ची आवश्यकता

राज्यातील बहुतांश खासगी रुग्णालयातील डॉक्टर ‘पीपीई’ची मागणी करू लागले आहेत

संग्रहित छायाचित्र

सुहास सरदेशमुख

राजेश टोपे यांची माहिती: मुंबईतील तीन कंपन्यांशी उत्पादनवाढीची चर्चा; प्रसंगी खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर घेणार

करोना विषाणूवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’(पीपीई)ची गरज आहे. राज्य सरकारने त्याची परस्पर खरेदी करू नये, असे निर्देश दिले असल्याने मागणी नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रमाणित असणाऱ्या तीन पीपीई उत्पादक कंपन्यांनी त्याचे उत्पादन वाढवावे, यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र गरज भासल्यास  दक्षिण कोरिया अथवा चीनमध्ये स्वतंत्र विमान पाठवून पीपीई आणता येतील काय, याची तयारी सुरू केली आहे. पालघर तालुक्यातील प्राइम वेअर ही कंपनी टाळेबंदीमध्ये काही दिवस बंदच होती. ती सुरू करण्यासाठी तेथील कामगारांना स्वतंत्र सुरक्षा पास देण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, राज्यात होणारी करोना विषाणूची बाधा हा चिंतेचा विषय नाही तर त्याचा मृत्यूचा दर वाढतो आहे, ही काळजीची बाब असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला  सांगितले.

राज्यातील बहुतांश खासगी रुग्णालयातील डॉक्टर ‘पीपीई’ची मागणी करू लागले आहेत. वास्तविक तशी सर्वाना त्याची आवश्यकता नाही. पण बरेच रुग्णालय बंद करून डॉक्टर घरातच बसले असल्यानेही अडचणींमध्ये वाढ होत आहे. डॉक्टरांनी रुग्णालये सुरू ठेवावीत, अशी विनंती करत आरोग्यमंत्री टोपे यांनी पीपीई संदर्भातील समस्या कशा प्रकारे सोडविल्या जात आहेत, याची माहिती दिली. ते म्हणाले, पालघर येथील प्राइम वेअरच्या मालकास बोलावून ‘पीपीई’चे उत्पादन प्रतिदिन तीन हजारांपर्यंत वाढविण्यास लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही अनुभवी शिंपी आणि कंपनीमध्ये कामगार पोहचतील, अशी व्यवस्था केली जात आहे. या निर्जंतुकीकरण केलेल्या पोषाखाची किंमत ७०० रुपये एवढी होती. ती आता बाजारपेठेत दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत गेली असली तरी त्याचे उत्पादन केवळ महाराष्ट्र सरकारलाच मिळेल, यासाठी एका उपजिल्हाधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या क्षेत्रातील दुसरी कंपनी ‘मॅग्नम हेल्थ’ असून ती बोरिवलीमध्ये आहे. तसेच कांदीवलीमध्येही एक कंपनी असून या तिन्ही कंपन्या तुलनेने छोटय़ा आहेत. एवढे दिवस याची एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गरज भासत नसे. मात्र, आता या कपंन्यांनी त्यांचे उत्पादन वाढवावे, असे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र, हे सारे प्रयत्न सुरू असताना अन्य देशातून पीपीई आणण्याच्या हालचालीही सुरू असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

रात्री दीडपर्यंत कामाचे नियोजन

सकाळी लवकर सुरू होणारा  दिवस गेल्या महिन्यातील १० एप्रिलपासून रात्री एकच्या सुमारास संपतो. नियोजनांच्या बैठकांबरोबर यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी काम करतो आहे. हा संकटाचा काळ आहे. सर्वाना काम करावेच लागेल. धारावी भागात जेथे करोनामुळे मृत्यू झाला त्या भागात  गेलो होते. तसेच तबलिकच्या प्रमुख मौलवींशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या समाजाकडून करोनाविरोधातील लढय़ात मोठे सहकार्य अपेक्षित असल्याने त्यांच्या प्रमुखांनी जनतेला आवाहन करावे, यासाठी चर्चा केली जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

एन-९५ मास्कची उपलब्धता

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात करोनाचा विषाणू पोहचला असल्याने तेथे एन-९५ची मागणी आहे. ते सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

व्हेंटिलेटर उपलब्ध करणार

महात्मा फु ले जनआरोग्य योजना मान्य असणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांतील व्हेंटिलेटर सरकारला लागले तर ताब्यात घेता येतील. त्यामुळे व्हेंटिलेटरची कमतरता भासणार नाही, असेही टोपे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:23 am

Web Title: requirement of ppe in the state abn 97
Next Stories
1 औरंगाबादमध्ये करोनाचा पहिला बळी; घाटीत उपचार सुरू असलेल्या व्यक्तीचा मृत्यू
2 करोनामुळे फूलशेतीला घरघर!
3 घरपोच भाजीसाठी नवे तंत्र
Just Now!
X