News Flash

‘महाज्योती’तील शिष्यवृत्तीची संशोधकांना प्रतीक्षा

मंत्र्यांची घोषणा हवेतच; जाहिरातीअभावी विद्यार्थी अस्वस्थ

(संग्रहित छायाचित्र)

महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (महाज्योती) आचार्य (पीएच.डी.) पदवीसाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथीप्रमाणेच शिष्यवृत्ती (फेलोशिप) देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्या अनुषंगाने ३१ मार्च २०२१ पूर्वी जाहिरात काढणे अपेक्षित असतानाही त्याबाबत कुठलीच हालचाल झालेली नाही. संशोधक विद्यार्थ्यांना कुठलेच भवितव्य नसल्याचा विचार सरकारी पातळीवरून होत असल्याचा आरोप करून शिष्यवृत्ती देण्यापासून संबंधित यंत्रणा दूर पळत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

नागपूरमध्ये महाज्योतीच्या संचालक मंडळाची एक बैठक मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली ७ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आली. बैठकीत महाज्योतीअंतर्गत पीएच.डी., एम.फिल. च्या संशोधक विद्यार्थ्यांना सारथी, बार्टीच्या धर्तीवर शिष्यवृत्ती देण्याचा ठराव घेण्यात आला. बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी मंत्री वडेट्टीवार यांनी ट्विट करून २०० संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा करून लवकरच जाहिरात काढण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही शिष्यवृत्ती देण्याबाबत पुढे काहीच झालेले नाही. महाज्योतीला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकही देण्यावर चर्चा झाली. त्याचाही निर्णय अधांतरीच आहे. सध्याचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद डांगे हे आजारी असल्याचे सांगितले जात असून मागील दीड महिन्यांपासून नागपूरच्या महाज्योती कार्यालयाअंतर्गतचे कामकाजही पुढे सरकलेले नाही. या कार्यालयात विद्यार्थी हेलपाटे मारत आहेत, संपर्क साधत आहेत. मात्र, त्यांना प्रतिसाद देणारा कार्यालयात कोणीही नाही, असा आरोपही संशोधक करत आहेत.

शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मध्यंतरी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेतली. भुजबळ यांच्यापुढे प्रश्न मांडला. त्यांनीही मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे विद्यार्थी सांगतात.

शिष्यवृत्तीसाठीचे बहुतांश संशोधक विद्यार्थी हे शेतकरी, ऊसतोड कामगारांची मुले आहेत. सारथी, बार्टीच्या धर्तीवर महाज्योतीच्या संशोधकांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कुठलीही नोकरी, खासगी काम करून चालत नाही. हातातील काम सोडून हे विद्यार्थी संशोधक होण्यासाठी पूर्णवेळ अभ्यासात असून प्रतिकूल परिस्थितीशीही दोन हात करत त्यांना जगण्यासाठी संघर्षही करावा लागत आहे. त्यामुळे महाज्योतीअंतर्गत येणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्तीबाबतचा ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने अस्वस्थता पसरली आहे.

कृषी विद्यार्थी सर्वाधिक

महाज्योतीअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अधिकच्या संख्येने म्हणजे १८४ च्या आसपास संशोधक हे राज्यातील चार कृषी विद्यापीठातील आहेत. दापोलीचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून २९, अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून ४५, परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातून ३० व राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत ७२ विद्यार्थी असल्याची माहिती आहे.

मंत्र्यांचा प्रतिसाद नाही

घोषणा केलेल्या शिष्यवृत्तीच्या संदर्भाने मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार व महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद डांगे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना संदेशही पाठवला. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

महाज्योतीअंतर्गत शिष्यवृत्तीबाबत (फेलोशिप) सरकारने केवळ घोषणाबाजी व जाहिरातच केलेली आहे. या संदर्भात कुठलीही कृती अथवा अंमलबजावणी झालेली नाही. येत्या ७-८ दिवसांत शिष्यवृत्तीबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही तर तीव्र आंदोलन करू.

– डॉ. रोहित चव्हाण, राज्य अध्यक्ष, अ‍ॅग्रिकल्चर डॉक्टोरेट्स असोसिएशन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:28 am

Web Title: researchers await scholarship for mahajyoti abn 97
Next Stories
1 ‘सिद्धार्थ’मध्ये आता पाच पांढरे वाघ
2 पैठणला मोसंबी प्रक्रिया उद्योगाचा फायदा किती?
3 औरंगाबादचा लॉकडाऊन स्थगित ; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
Just Now!
X