बिपीन देशपांडे

निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव औटे यांनी आपलाच ‘सोडवणुकी’चा विधी आयोजित केला आहे. ‘सोडवणूक’ हा विधी मृत्युपश्चात तेराव्या, चौदाव्या दिवशी केला जातो. पण विठ्ठलरावांची इच्छा याची देही, याची डोळा करण्याची. ते राहात असलेल्या वृद्धाश्रमात.

बीडजवळील कामधेनू आरोग्यधाम या वृद्धाश्रमात मागील सात वर्षांपासून वास्तव्यास आहेत. आयुष्याची ७९ वर्षे पार केलेले विठ्ठलराव शिक्षकी सेवेतील. मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले.  मृत्यूनंतर काय होईल, असाही विचार ते करू लागले. त्यातूनच मृत्यूनंतर दहाव्या, तेराव्या, चौदाव्या दिवशी करण्यात येणाऱ्या विधींची तयारी सुरू केली. याची देही, याची डोळा, याप्रमाणे. येत्या १९ तारखेला ‘सोडवणूक’ हा विधी ते करणार आहेत. त्याच दिवशी देहदानाच्या संकल्पाची तयार केलेली कागदपत्रे आरोग्यधामकडे ते सुपूर्द करणार आहेत. या माहितीला आरोग्यधामचे संचालक श्रीनिवास कुलकर्णी यांनीही पुष्टी दिली आहे.

वृद्धाश्रमात ज्यांच्यामुळे राहण्याची वेळ आली त्या मुलांवर मृत्यू पश्चातच्या विधीकर्माच्याही खर्चाचा भार नको म्हणून विठ्ठलरावांनी सोडवणूक या विधीचा मार्ग निवडला असू शकतो, असे कुलकर्णी यांनी सांगितले. सध्या कामधेनू आरोग्यधाममध्ये २५ वृद्ध आहेत. त्यातील चौघांनी देहदानाचा संकल्प केला असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. औरंगाबादमधील मातोश्री वृद्धाश्रमातील ४५ ज्येष्ठांनी नुकताच देहदान संकल्पाचा अर्ज भरून घेतला आहे. माहेश्वरी मंडळातर्फे आयोजित शिबिरात हा देहदानाचा संकल्प अर्ज भरून घेतल्याची माहिती मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी दिली.

वृद्धाश्रमात राहावे लागत असल्याची खंत अनेक ज्येष्ठांच्या बोलण्यातून व्यक्त होते. काही ज्येष्ठांमध्ये कुटुंबातील सदस्यांविषयी एक प्रकारची घृणा दिसते. त्यातून काहींनी देहदानाचा संकल्प केलेला असण्याची दाट शक्यता वाटते. तर काहींनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी कामी येणाऱ्या शरीराचे महत्त्व पटल्यामुळे देहदानाचा निर्णय घेतला आहे. काही वृद्ध हे घरापासून तुटलेले नाहीत.

– सागर पोगोरे, व्यवस्थापक, मातोश्री वृद्धाश्रम, औरंगाबाद.