विभागीय महसूल आयुक्तालयाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार लक्षात आला. आमच्या समाजावर अन्याय होत असल्याचा अरबी मजकूर टाकून हे संकेतस्थळ हॅक करण्यात आले. विभागीय आयुक्तांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या सायबर सेलला तोंडी कळविले. मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार विजयकुमार राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
संकेतस्थळ हॅक करण्याच्या या प्रकारामुळे संकेतस्थळावरील मजकुरात काही फरक पडणार नाही. या अनुषंगाने एका खासगी कंपनीकडून सुरक्षा कोड मागविण्यात आला आहे. सर्व माहिती सुरक्षित असल्याचा दावा महसूल प्रशासनाने केला. या पूर्वी २००७मध्येही हे संकेतस्थळ हॅक करण्यात आले होते. तेव्हा त्याच्या सुरक्षेसाठी अमेरिकेतील एका कंपनीकडून सुरक्षेची उपाययोजना केली होती. फालेगा टीमने हे संकेतस्थळ हॅक केल्याचे मजकुरात म्हटले असून, रात्री याबाबतची माहिती सामान्य प्रशासनाच्या उपायुक्तांनी सायबर सेलकडे दिली. माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६५ व ६६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.