औरंगाबाद : भूखंडाचे आरेखन मंजूर नसतानाही ती असल्याचे भासवून दोन ग्राहकाकडून भूखंडाचे १० लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राहकाच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद भागातील सादातनगर भागात राहणारे अमजद खान गौस खान हे रिक्षाचालक असून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. मिर्झा जफर बेग या व्यक्तीकडून अमजद यांनी चित्तेगाव कंपनीजवळ एनए ४४ चा प्लॉट खरेदी केल्याने त्यांची ओळख झाली. चार महिन्यांपूर्वी मिर्झा जफर बेग याने चितेगाव भागातील गट क्रमांक ५७ मध्ये जावेद पटेल यांच्या शेतात नवीन प्लॉटींग करत असल्याचे सांगितले. त्यातील काही प्लॉट खरेदी करायचे असेल तर सांगा, असे अमजद यांना म्हटले. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये कोपऱ्यावरचा भूखंड पसंत पडल्याने ३२ व ३३ क्रमांकाचा भूखंड खरेदी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही भूखंडाचे प्रत्येकी पाच लाख असे १० लाख रुपये मिर्झा जफर बेग यांना दिले. १ ऑक्टोबर २०१८ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला नोटरीकृत खरेदीखत करून घेतले. खरेदीखत करारनामा करताना १५ दिवसांच्या आत नोंदणीकृत खरेदीखत करण्याचे निश्चित केले होते. परंतु मुदत संपल्यानंतरही मिर्झा जफर बेग याने खरेदीखत करून दिले नाही आणि टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर अमजद यांनी चित्तेगाव गट क्रमांक ५७ मधील जमिनीबाबत चौकशी केली असता एनए ४४ ले आऊट मंजूरच नसल्याचे समोर आले. याबाबत मिर्झा जफर बेग याच्याकडे विचारणा केल्यानंतर शेख जावेद शेख रसूल (रा. सिल्कमिल कॉलनी) याच्यासोबत ४ सप्टेंबर २०१८ रोजी १०० रुपयांच्या मुद्रांकावर केलेला करारनामा दाखविला. त्यामध्ये भूखंड कायदेशीर असल्याचे दाखविले होते. त्यानंतर शेख जावेद यांच्याकडे विचारणा केली असता आरेखन मंजूर असल्याचे सांगून त्याची प्रत दिली. अमजद यांनी या आरेखनाबाबत चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. गट क्रमांक ५७ मधील जमीन ही गौरव दीपक भारूका यांच्या नावे अस्ल्याचे समोर आले. भारुका यांनी ६ सप्टेंबर रोजी या जमिनीचा जीपीए करून दिलेला आहे. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे भारूका यांनी जीपीए करून दिल्याचा दोन दिवस आधीच म्हणजे ४ सप्टेंबर २०१८ रोजीच शेख जावेद यांनी मिर्झा आजम बेग यांना १०० रुपयांच्या मुद्रांकावर इसारपावती करून दिली. त्यावेळी कोणताही अधिकार नसताना हा प्रकार केला. याच पावतीच्या आधारे मिर्झा जफर बेग याने दोन भूखंड विक्री करत १० लाख रुपये अमजद यांच्याकडून घेतले होते.

एकानंतर एक घोळ समोर येत असल्याने अमजद यांनी चित्तेगाव ग्रामपंचायतीत चौकशी केली. तेव्हा ग्रामपंचायतीला आरेखन मंजूर करण्याचा अधिकारच नसल्याचे समोर आले.

असे असताना ग्रामपंचायतीकडून आरेखन मंजूर केल्याचे दाखविण्यात आले होते. मिर्झा जफर बेग आणि शेख जावेद या दोघांनी आपली १० लाखांची फसवणूक केल्याचे अमजद यांच्या लक्षात आले. त्यामुळे अमजद यांनी सिटी चौक पोलीस ठाणे गाठून दोघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.