सुहास सरदेशमुख

सप्टेंबर महिन्यात चार चाकी गाडी खरेदी केल्यानंतर ती मिळण्यासाठी पंधरा दिवसांपर्यंतची प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, तीन चाकी गाडीची चाके पुरती रुतली असल्याचे वाहन क्षेत्रातील उद्योजक सांगत आहेत. तर तीन चाकी उत्पादनामध्ये आणि विक्रीमध्ये ७५ ते ७६ टक्क्यांची घट दिसून येत आहे. मात्र, खुल्या परवान्यामुळे ऑटो रिक्षा घेण्याचे प्रमाण पूर्वीच घटले होते, त्यात टाळेबंदीमुळे नवी भर पडल्याचे प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी सांगत आहेत. दरम्यान, ऑटो रिक्षा क्षेत्रातील उत्पादकांपासून ते ती चालविणाऱ्यांपर्यंत सर्व चाक फसले असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद शहरात चालक म्हणून काम करणाऱ्या अनिता सांगत होत्या, ‘रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतल्यापासून आतापर्यंत एवढा ताण कधी आला नव्हता. दिवसभरात फार तर दोन किंवा तीन भाडी होतात. पेट्रोलखर्च वगळता दिवसभरात शंभर रुपये हाती लागत नाहीत. सारे जगणेच बदलून गेले आहेत. दोन मुले आहेत. एक जण दहावीत आहे आणि एक जण चौथीमध्ये आहे. पण त्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारे मोबाइल, इंटरनेट यासाठीचा खर्चही झेपणारा नाही.’ बाजारात आता नवी ऑटो रिक्षा येण्याची शक्यताच दिसत नाही. करोना संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:चे वाहन वापरण्याकडे कल वाढला असल्याने सार्वजनिक वाहनातून प्रवास टाळला जात आहे. त्यामुळे तीन चाकीचे अर्थकारण घसरणीला लागले आहे.

औरंगाबाद शहरात तीन चाकी ऑटो रिक्षांचे उत्पादनही होते. मागणी नसल्याने रिक्षा उत्पादन मोजकेच सुरू आहे. पाच लाख रुपयांच्या चार चाकी गाडय़ांची मागणी वाढलेली आहे. उद्योजक उन्मेष दाशरथी म्हणाले की, ‘दुचाकी आणि चारचाकी उत्पादनात आता फक्त कोविडची अडचण आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये कामगारांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत करोना संसर्ग वाढलेला आहे. त्यामुळे कामगारांची गैरहजेरी हा अनेक उद्योग आणि त्यांना साहित्य पुरविणाऱ्या कंपन्यांसमोर पेच निर्माण झाले आहेत. पण दुचाकी आणि चार चाकीचे उत्पादन आणि विक्री यात करोनापूर्व काळातील स्थिती आली आहे. मात्र तीन चाकीचे उत्पादन पूर्णत: घसरले आहे.’

औरंगाबाद जिल्ह्य़ात करोनापूर्व काळात जानेवारी महिन्यात १३१ ऑटो रिक्षा विकल्या गेल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये व मार्चमध्ये ६०-६५ रिक्षा विकल्या गेल्या होत्या. जूनमध्ये ही संख्या ३०-३२ नगावर पोहोचली. अर्ध्याहून अधिक मागणी घटली. ऑगस्टमध्ये झालेली विक्री संख्या केवळ ११ एवढी होती.

टाळेबंदीमुळे बेरोजगारी वाढली असली तरी रिक्षा चालविण्याकडे पूर्वी असणारा कल राहिलेला नाही. कारण ग्राहक नाही. त्यामुळे रिक्षा घेण्याकडे ना तरुणांचा ओढा आहे, ना बँकांकडून त्यांना सहकार्य मिळते. त्यामुळे तीन चाकीचे चाक पुरते रुतले आहे. चार चाकी उत्पादन आणि मागणीत चांगलीच वाढ आहे.