हिंसक वळण लागलेल्या घटनांनंतर औरंगाबाद शहर रविवारी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. शनिवारी रात्रीपासून पोलिसांनी ५० जणांना ताब्यात घेतले असून १४ जणांना अटक केली आहे. जिन्सी, क्रांती चौक व सिटी चौक पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेश धुडकावून दगडफेक केल्याप्रकरणात जवळपास अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या अब्दुल हरीस अब्दुल कादरी या युवकावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मोतीकारंजा, शहागंज, राजाबाजार, संस्थान गणपती या भागात तणावपूर्ण शांतता आहे. आजही दिवसभर या भागातील दुकाने बंदच होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दंगलग्रस्त भागात भेटी दिल्या. तसेच कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीन बिहारी यांनीही घटनेचा आढावा घेतला.

शुक्रवारी रात्री उसळलेल्या दंगलीत पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात चौघांना फायबर बुलेट लागली होती. यात अब्दुल हरीस अब्दुल कादरी याचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांची प्रकृती आता सुधारत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुजीब व इम्रान शेख या गोळी लागलेल्या दोन रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले. अन्य एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दंगेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली होती. यात जखमी झालेले सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्या स्वरयंत्रावर दगडाचा मार बसला आहे.

रविवारी दुपारी सकाळपासून औरंगाबाद शहरातील परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये हल्लेखोरांकडून गुप्ती आणि तलवारी जप्त करण्यात आल्या. शहरातील विविध सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास अब्दुल हरीस याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावरील अंत्यसंस्कार विनाअडथळा व्हावेत, अशी काळजी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी घेतली. जगनलाल छगनलाल बन्सिल यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोप-प्रत्यारोप सुरूच

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली. तसेच खासदार खैरे यांनी प्रक्षोभक वक्तव्य करून दंगा भडकाविला. त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. विखे पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या दोघांनी एकाचवेळी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या अब्दुल हरीस कादरी याच्या घरी विखे पाटील गेले. रावसाहेब दानवे आणि भाजपचे पदाधिकारी मात्र अलीकडूनच परत आले. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणामुळे असा त्यांना सल्ला दिला होता, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

पेट्रोल कोठून आणले

दोन गटांतील हिंसाचारानंतर पन्नासहून अधिक दुकानांना आग लावताना पेट्रोल कोठून आणले जात होते, असा प्रश्न दोन्ही बाजूंनी विचारला जात होता. दंगलग्रस्त भागात तिखटाचे पाणी आणि गोटय़ांचा मारा केल्याचे दिसून येत होते. काचेच्या गोटय़ा बाटलीत भरून त्या फेकल्या जात असल्यामुळे जखमींची संख्या वाढल्याचे सांगितले जाते.