स्वच्छ भारत मिशनतंर्गत हागणदारी मुक्त महाराष्ट्रासाठी शासनाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. राज्यशासनाकडून हागणदारी मुक्त महानगरपालिका करण्यासाठी सक्त निर्देश देण्यात आले आहेत. या उपकर्मा अंतर्गत शहरातील विविध वार्डामध्ये पाहणी करण्यात येते. मंगळवारी पालिकेच्या गुडमोर्निंग पथकाऐवजी स्वतः मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे या पाहणीवेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना आयुक्तांनी गुलाबाची फुले दिली.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत औरंगाबाद शहरात शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेला आदेश देण्यात आले आहेत. यासाठी पालिकेला आक्टोबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आली असून  ११ हजार शौचालये बांधणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेस दोन टप्प्यात निधी मंजूर करण्यात आला. पहिल्या टप्यात ५ कोटी ६६ लाख तर दुसऱ्या टप्यात २ कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र शहरात अनुदान घेऊनही अद्याप शौचालये बांधली नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पालिकेच्यावतीने आज मुकुंदवाडी, भारत नगर या परिसरात पाहणी करण्यात आली. शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी नागरिकांनी शौचालये बांधून त्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले.