औरंगाबाद महापालिकेतील नगरसेविका कुरैशी यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली. यामध्ये तब्बल १० लाखांचा एवज चोरीला गेला आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समता नगरच्या नगरसेविका रेश्मा अश्फाक कुरैशी यांच्या लहान नणंदेचे लग्न होते. त्यासाठी घरातील सर्वजण बीड बायपास परिसरातील फातेमा मंगल कार्यालयात गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी कुरैशी यांच्या घरी चोरी केली. रेश्मा कुरैशी यांच्या भावाच्या खोलीच्या दरवाजाचे कुलुप तोडून कपाटातील ४ लाख ६० हजारांची रक्कम आणि तब्बल सहा लाख रूपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लांबवले. लग्न समारंभ आटोपल्यानंतर रेश्मा अश्फाक कुरैशी यांचे भाऊ घरी आले तेव्हा ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर बोलवण्यात आले. पोलिसांनी श्‍वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचरण केले. कुरैशी यांच्या घराजवळ एका बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच मुख्य रस्त्यावरील मेडीकलवरही सीसीटीव्ही कॅमेर्‍यात आरोपी कैद झाल्याचे कुरैशी यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.